आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुख्यमंत्र्यांसह तीन मंत्र्यांविरुद्ध पैठण पोलिस ठाण्यात तक्रार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पैठण- पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना तूर पेरण्याचे आवाहन केल्याने राज्यात जास्तीची तूर पेरणी झाली. परंतु आता हे सरकार तूर खरेदी करत नसल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व सहकार, पणन व वस्त्रोद्योग मंत्री सुभाष देशमुख, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात अन्नदाता शेतकरी संघटनेने पैठण पोलिस ठाण्यात तक्रार दिली असून पैठण पोलिसांनी तक्रार दाखल करून घेतली आहे.  
 
पैठण तालुक्यात आजही दहा हजार क्विंटलहून अधिक तूर खरेदी होणे बाकी आहे. २२ तारखेपर्यंत मुदत देण्यात यावी, अशी मागणी मुख्यमंत्र्यांनी केंद्र स्तरावर केल्यामुळे पुन्हा तूर खरेदी करण्यास सुरुवात होईल, या आशेवर शेतकरी तूर घेऊन बाजार समितीत मुक्कामी आहेत. तीन महिन्यांत केवळ ४० दिवस तूर खरेदी सुरू राहिली. दरम्यान, येथे व्यापाऱ्यांची तूर खरेदी करण्याला प्राधान्य देण्यात आल्याने ग्रेडर आणि शेतकरी असा वाद होऊन दीड दिवस तूर खरेदी बंद होती.  राज्य सरकारने तूर खरेदी करण्याचे आदेश दिले तरी येथे बारदाने उपलब्ध नसल्याने तूर खरेदीचा प्रश्न कायम राहणार आहे. पैठणमध्ये सुरुवातीपासून तूर खरेदीमध्ये सावळा गोंधळ झाल्याने व्यापारी व बड्या शेतकऱ्यांच्या तुरी अगोदर खरेदी करण्यात आल्या. सामान्य शेतकऱ्यांची तूर अद्याप खरेदीच्या प्रतीक्षेत असतानाच तूर खरेदी केंद्र बंद झाले.
 
टोकनचे ३०७ शेतकरी प्रतीक्षेत
पैठण बाजार समितीत ३०७ शेतकऱ्यांना प्रवेश पास देऊन तूर खरेदीची प्रतीक्षा असल्याची माहिती बाजार समितीचे सचिव नितीन विखे यांनी दिली. आतापर्यंत  २६ हजार ६३८ क्विंटल तुरीची खरेदी करण्यात आलेली असून अद्याप साडेसहा हजार क्विंटल हून अधिक तूर खरेदी होणे अपेक्षित आहे.
 
साडेआठ हजार क्विंटल तूर पडून
पैठणमध्ये साडेआठ हजार क्विंटल तूर शिल्लक असल्याचा दावा प्रशासन करत असले तरी जवळपास पाचशे शेतकऱ्यांची दहा हजार क्विंटलच्या वर तूर बाजार समितीत पडून आहे. शासनाची तारीख वाढेल व आपली तूर खरेदी होईल, या आशेवर शेतकरी असल्याचे चित्र पैठणमध्ये आहे. पैठण तालुक्यात साडेआठ ते दहा हजार क्विंटल तूर खरेदी होणे शिल्लक असून तसे आम्ही शासनाला कळवले असल्याचे तहसीलदार सी. डी. मेंडके यांनी सांगितले.
 
 
बातम्या आणखी आहेत...