आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Complaints Against Chandrakant Kahire On Matoshree

चक्र फिरले : खा. खैरे यांच्याच विरोधात मातोश्रीवर तक्रारींचा महापूर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - माजी खासदार मोरेश्वर सावे, संपर्कप्रमुख मधुकर सरपोतदार असो की मंत्री दिवाकर रावते, अलीकडचे संपर्कप्रमुख विनोद घोसाळकर अशा प्रत्येकाच्या विरोधात खासदार चंद्रकांत खैरे यांनी वेळोवेळी तक्रार केली. त्याची दखल घेत या सर्वांना औरंगाबादच्या राजकारणापासून दूर करण्याचे काम मातोश्रीने केले.
मात्र अलीकडे जिल्ह्याचे पालकमंत्री रामदास कदम यांची भाईगिरी खैरेंच्या विरोधात गेली अन् खैरे यांनी मातोश्रीवर धाव घेतली. त्यामुळे खैरेंच्या तक्रारींची दखल घेऊ नका, पेरले तेच उगवते, अशी चर्चा शिवसैनिकांमध्ये आहे.
खैरे यांनी एकच तक्रार करण्याचा प्रयत्न केला, पण त्यानंतर औरंगाबाद जिल्ह्यातील प्रत्येक कार्यकर्त्याने तक्रार केल्याचेही समोर आले आहे. त्यामुळे खैरे यांच्या विरोधात मातोश्रीवर तक्रारींचा अक्षरश: महापूर असल्याचे समोर आले आहे. सोयीचा संपर्कप्रमुख खैरे यांनी घेण्याचा प्रयत्न केला. पण प्रत्येकाच्या तक्रारी केल्या.
आपल्याच मनाप्रमाणे पक्ष चालावा, असे त्यांना वाटत होते. परंतु आता खमक्या माणूस भेटला. त्यांना थेट उद्धव ठाकरे यांचा वरदहस्त असल्याचे समोर आले. खैरे यांच्या विरोधात तक्रारी होऊ शकतात, असे जाणवल्यानंतर प्रत्येकाने आपापल्या परीने तक्रारी करण्यास सुरुवात केल्याचे समोर आले.
लोकसभा निवडणुकीत एकत्र लढूनही भाजपने शिवसेनेला सत्तेचे पाणी पिऊ दिले नाही, जे काही दिले, त्यात खा. खैरे यांचा क्रमांक लागला नाही. यापुढे त्यांना केंद्रात मंत्रिपद मिळते की नाही, हेही सांगता येत नाही. विधानसभा निवडणुकीत सेनेला मोठे यश मिळाले. भाजपने त्यांना सत्तेत सहभागी करून घेताना मोजकीच मंत्रिपदे दिले. त्यात रामदास कदम यांचा समावेश झाला अन् ते पुढे औरंगाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री झाले.
कदम यांनी पालकमंत्रिपद स्वीकारल्यापासून प्रत्येक गोष्टीत खा. खैरे यांचा पाणउतारा करण्याचे धोरण स्वीकारले. ते अजूनही कायम आहे. उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमातही खैरेंच्या नशिबी तेच बोल आल्याने अनेकजण सुखावले. मात्र वय तसेच पक्षातील ज्येष्ठत्व असतानाही नशिबी पाणउतारा येत असल्याने गेल्या आठवड्यात खैरे यांनी मातोश्रीवर जाऊन तक्रार करण्याचा प्रयत्न केल्याचे समोर आले. मात्र आतापर्यंत खैरे यांनी जे केले, तेच त्यांच्या नशिबी आले.
डी गँगच्या आरोपानंतर माघारीला सुरुवा : गतवर्षी खैरे यांनी काही नगरसेवकांवर आरोप करताना डी गँग असा शब्दप्रयोग केला होता. त्यानंतर काही नगरसेवकांनी थेट गुलमंडीवरच उपोषण केले. तेव्हा खैरे यांना प्रथमच माघार घ्यावी लागली. त्यांनी जाहीर माफी मागितली. तेव्हापासूनच खैरे यांच्या नशिबाचे फासे फिरले, असे काहींचे म्हणणे आहे. डी गँग म्हणजे दर्डा यांची गँग असा युक्तिवाद त्यांनी नंतर केला. पण तोवर वेळ निघून गेली होती. त्यानंतर विनोद घोसाळकर व पुढे थेट कदम समोर आल्याने खैरे यांची कोंडी झाली. त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग तूर्तास दिसत नसल्याचे त्यांचे निकटवर्तीय सांगतात.
खैरे मातोश्रीवर ताटकळून परतले

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार रामदास कदम यांच्या विरोधात तक्रार करण्यासाठी मागील आठवड्यात खा. खैरे हे मुंबईत गेले होते. परंतु मातोश्रीवर त्यांना प्रवेश नाकारण्यात आला. दोन तास खैरे हे ताटकळले होते. गेल्या अनेक वर्षांत खैरे यांच्यामुळे अनेकांनी मातोश्रीवर स्व. बाळासाहेब ठाकरे तसेच उद्धव ठाकरे यांची भेट घेता आली नव्हती.
तीच वेळ आता खैरे यांच्यावर आली, असल्याचे सांगण्यात येते. खैरे यांनी रामदास कदम यांची तक्रार केल्याची चर्चा असली तरी प्रत्यक्षात खैरे यांना मातोश्रीत एंट्री मिळाली नसल्याचे समजते.
खा. खैरेंच्या तक्रारीचे बळी

माजी खासदार मोरेश्वर सावे, माजी संपर्कप्रमुख मधुकर सरपोतदार, दिवाकर रावते, अतुल सरपोतदार, विलास अवचट, विश्वनाथ नेरूरकर, अलीकडे विनोद घोसाळकर.

स्थानिक बळी : प्रदीप जैस्वाल, किशनचंद तनवाणी, अंबादास दानवे, संजय शिरसाट, सुहास दाशरथे, लता दलाल, नंदकुमार घोडेले, अनिता घोडेले, सुदाम सोनवणे, सुशील खेडकर, राजू वैद्य, त्र्यंबक तुपे, गजानन बारवाल, जगदीश सिद्ध, बाळासाहेब थोरात. जया गुदगे. रजनी जोशी, राधाकृष्ण गायकवाड, सुभाष पाटील, बाबासाहेब डांगे, भाऊसाहेब वाघ, गणेश वानखेडे, विधानसभा निवडणुकीत भाजपमध्ये गेलेले सर्व आणि सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अशीच परिस्थिती राहिली तर असंख्य.