आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चार वर्षांत लैंगिक छळाच्या चार तक्रारी, आज विद्यापीठात समुपदेशन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात मागील चार वर्षांत लैंगिक छळाच्या ४ तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. शिवाय यापैकी तीन तक्रारी अत्यंत किरकोळ असून त्यात गैरअर्जदाराला समज देण्यात आली आहे. अंतर्गत तक्रार निवारण समितीतर्फे बुधवारी एकदिवसीय चर्चासत्र होणार आहे. यात नवीन अधिनियमातील तरतुदींवर चर्चा होईल.
सर्वोच्च न्यायालयाचे आदेश आणि यूजीसीच्या निर्देशानुसार "कामाच्या ठिकाणी महिलांचे लैंगिक छळापासून संरक्षण, प्रतिबंध, मनाई आणि निवारण समिती' गठित करण्यात आली आहे. या समितीला पूर्वी विशाखा समिती असे संबोधण्यात येत होते. आता अधिनियम २०१३ च्या कलम-४ नुसार "अंतर्गत तक्रार निवारण समिती' असे संबोधले जाते. विद्यापीठात अशी समिती १९९९ पासून कार्यरत आहे. मात्र १९९९ ते २०११ पर्यंत समितीचे उल्लेखनीय कार्य नाही. शैक्षणिक सत्र २०११-१२ पासून इंग्रजी विभागाच्या प्रोफेसर डॉ. मेबल फर्नांडिस यांच्याकडे अध्यक्षपद आहे. समितीची व्याप्ती वाढवत त्यांनी संलग्नित महाविद्यालयांनाही समित्यांचे गठन करण्यास भाग पाडले. शिवाय चारही जिल्ह्यांतील प्रातिनिधिक ८० महाविद्यालयांना भेटी देऊन समितीच्या कामकाजाची पाहणी केली. दुर्लक्ष करणाऱ्या महाविद्यालयांकडून त्यांनी बसल्याजागी समिती गठित करून घेतली. ९५ टक्के महाविद्यालयांत समिती कार्यरत आहे. २०११ ते २०१५ पर्यंत म्हणजेच मागील चार वर्षांत डॉ. फर्नांडिस यांच्याकडे लैंगिक छळासंदर्भात चार तक्रारी प्राप्त आहेत. त्यापैकी दोन तक्रारी एकाच प्राध्यापिकेच्या असून महिला कर्मचाऱ्यानेही सहकाऱ्याविरुद्ध लैंगिक छळासंदर्भात तक्रार दिली होती. या सर्व प्रकरणांचा डॉ. फर्नांडिस यांच्या नेतृत्वातील समितीने निपटारा केला. शिवाय सर्व विभागांत समिती सदस्यांच्या मोबाइल क्रमांकासह दर्शनी भागात भव्य फलक लावण्यात आले आहेत.
विद्यार्थिनीची क्षुल्लक तक्रार : एका विभागातील विद्यार्थिनीने विद्यार्थ्याच्या विरोधात छेडछाड केल्याची तक्रार दिली होती. नोटीस बोर्ड पाहताना जीन्स पँट, टी शर्ट परिधान केलेल्या विद्यार्थिनीला मुलाने "अरे वा! ही मुलगी आहे की मुलगा?' असा टाँट मारला होता. मुलाने मात्र शेवटपर्यंत छेडछाड केली नसल्याचे समितीला सांगितले. विद्यार्थ्याचे समुपदेशन करून त्याला सोडले.
सुरक्षेसाठी घ्या काळजी
सुरक्षितता स्वत:च्या हाती असते. त्यामुळे महिला, मुलींनी शक्यतो निर्जन स्थळी जाऊ नये. रात्री उशिरा अंधारात निघण्याची गरज नाही. मित्र निवडताना विश्वनीयता तपासा. स्मार्टफोन, मोबाइलमध्ये फोटो घेतले जात नाहीत ना याची मुलींनी स्वत:च काळजी घ्यावी. गरज पडल्यास मला फोन करावा. समितीतर्फे त्यांना पूर्णपणे सहकार्य दिले जाईल. डॉ. मेबल फर्नांडिस, अध्यक्षीय अधिकारी