दिव्य मराठी इम्पॅक्ट
औरंगाबाद - शहरापासून ३० किमी जवळ असणाऱ्या नागोणीची वाडीतील दुर्लक्षित भुताच्या टेकडीचे वृत्त "दिव्य मराठी'तून रविवारी (दि. २ ऑगस्ट) प्रसिद्ध होताच टेकडीसह गावाच्या विकासासाठी मदतीचा प्रंचंड ओघ सुरू झाला. पन्नास ते साठ नागरिकांनी टेकडीला भेट देऊन मदत देऊ केली. अमेरिकेतील रीड इंडिया या स्वयंसेवी संस्थेने टेकडीवर गावकऱ्यांसाठी अनेक सुविधा उपलब्ध करून देत आठच दिवसांत टेकडीचा कायापालट केला.
आठ दिवसांपूर्वी "दिव्य मराठी'ने "भुताची टेकडी बनले आरोग्य केंद्र' हे वृत्त प्रसिद्ध करून डॉ. अमर देशमुख व त्यांच्या पत्नीची धडपड प्रकाशात आणली. शहरातील चैनीचे आयुष्य त्यागून ते तीन वर्षांच्या मुलीसह भुताची टेकडी म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या नागोणीच्या वाडीतील ७०० फूट उंच ठिकाणावर वास्तव्यास आले. स्वातंत्र्याला ६८ वर्षे झाली तरी ८०० लोकसंख्या असलेले नागोणीची वाडी विकासापासून कोसो दूर असल्याचे या वृत्तात म्हटले होते.
बातमी प्रसिध्द होताच मदतीचा ओघ...
या बाबत डॉ.देशमुख यांनी सांगितले, हे गाव विकासापासून कोसो दूर आहे. दिव्य मराठीने प्रथम गावाची व्यथा मांडली व मदतीचा ओघ सुरु झाला. प्रथम भूताची भीती गेली कारण तेथे प्राणीच चित्रविचीत्र आवाज काढत असल्याची सर्वांना खात्री पटली. अनेक लोकांनी टेकडीला भेट देऊन गावाच्या विकासात खारीचा वाटा उचलण्याचा संकल्प केला. कुणी पुस्तके तर कुणी रोजगार उपल्ब्ध करुन देण्याची योजना दिली. भूताच्या भयाने ग्रस्त असलेले गाव आता माणसांच्या गर्दीने गजबजते आहे. गावात चौथीपर्यंत शाळा आहे. त्यामुळे गावातील मुलींना शहरात येऊन शिक्षण घेणे जड जात होते. मुली सातवी नंतर शाळाच सोडून देतात अशी आजही अवस्था आहे. रस्ते,वीज ,पाणी यासह शौचालये नाहीत. सर्व अल्पभूधारक शेतकरी अशी गावाची अवस्था आहे. या गावाबाबतचे वृत्त सर्वप्रथम दिव्य मराठीने प्रकाशित कले अन गावाच्या विकासाची गंगा चालत आली.
साधे गावकरी अन् माऊस
पुस्तके, संगणक, माऊस, डिजिटल लायब्ररी पाहून गावकरी हरखून गेले. रीड इंडियाच्या भारतातील प्रमुख गीता मल्होत्रा दिल्लीहून तर पर्किन्सच्या एचआर व्यवस्थापक सुमन विश्वास यांच्या पुढाकाराने हा कार्यक्रम टेकडीवर झाला. पत्र्याच्या रूममध्ये रंगरंगोटी करून हायटेक डिजिटल बालवाडी सुरू झाली. मुलांसाठी वाचनालय सुरू झाले. तर महिलांना शिवणयंत्र देऊन स्वयंरोजगाराच्या अनोख्या वर्गाचे उद््घाटन गावकऱ्यांच्या हस्ते झाले.
अंधश्रद्धा दूर झाली...
^ मी दोन वर्षांपासून भुताच्या टेकडीवर वास्तव्यास आहे. अनेक योजना डोक्यात होत्याच, परंतु "दिव्य मराठी'मुळे गावकऱ्यांची अंधश्रद्धा दूर झाली. भूत नसून प्राणी हे आपले वैभव आहे हे आम्हा सर्वांना "दिव्य मराठी'च्या माध्यमातून पटले. मदतीचा प्रचंड ओघ सुरू झाल्याने मी भारावलो. आता समाजसेवेचे मोठे काम करावे लागेल हा संदेश या बातमीतून बळ देऊन गेला.
-डॉ. अमर देशमुख
पुढे वाचा, भुताच्या टेकडीवर डिजीटल स्कूल...