आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संगणकच सांगेल रोगाचे नाव अन् पिकावरचा उपचार...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
छायाचित्र: सॉफ्टवेअर अत्यंत युजरफ्रेंडली करण्याचे काम सुरू आहे. मधमाशीचे पोळे जसे असते तसे दूरवरून याचे चित्र दिसते.
औरंगाबाद - पिकावर रोग पडल्यावर फक्त फोटो व्हॉटसअॅप किंवा मेल केला तरी संगणकच शेतकऱ्याला रोगाचे नाव अन् पिकावर नेमका काय उपचार करायचा हे सांगणार आहे. असे अनोखे सॉफ्टवेअर डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील प्राणिशास्त्र विभागातील प्रा. डॉ. गुलाब खेडकर यांच्या टीमने विकसित केले आहे. अशा प्रकारचा प्रयोग करणारे ते देशातले पहिलेच विद्यापीठ ठरेल, असा दावा शास्त्रज्ञ प्राध्यापकांनी केला आहे.

विद्यापीठाच्या प्राणिशास्त्र विभागात प्रा. डॉ. गुलाब खेडकर कार्यरत आहेत. ते पॉल हबर्ट अर्थात डीएनए बारकोड सेंटरचे प्रमुख आहेत. याच केंद्रात त्यांनी सापांच्या कातींवर अनोखे संशोधन करून कातींवरून सापांचा डीएनए ओळखता येतो, हे प्रथम त्यांनीच सांगितले. हे संशोधन सुरू असतानाच त्यांनी महाराष्ट्रातील कीटकांच्या शेकडो जातींवरील संशोधन प्रकल्प हाती घेतला आहे. भारतात कीटकांच्या हजारो जाती आहेत. पिकावर रोग पडला की शेतकरी हवालदिल होतो. योग्य मार्गदर्शनाअभावी त्याचे मोठे अार्थिक नुकसान होते.

कीटकांचा डिजिटल विश्वकोश..
कीटकाची फोटोसह एकत्रित नोंद मात्र कुठे सापडत नाही. पॉल हबर्ट लॅबचे प्रमुख डॉ. गुलाब खेडकर यांनी हे अवघड आव्हान स्वीकारून देशातीलच नव्हे तर निदान महाराष्ट्रातील कीटकांच्या जातींची संगणकावर नोंद घेण्यास सुरुवात केली आहे. यात त्यांनी महाराष्ट्रातील खेड्यापाड्यांतील शेकडो कीटकांचे फोटो काढून त्यांचे शास्त्रीय नाव, जाती प्रजाती, आढळ स्थान व बोली भाषेतले नाव याची डिजिटल नोंद घेतली आहे. संगणकावर कीटकाचे नाव टाकताच त्या कीटकांच्या लाखो जाती अभ्यासकांना शोधता येणार आहे.

शेतकऱ्यांसाठी हेल्पलाइन..
डॉ. गुलाब खेडकर यांच्यासोबत सात संशोधक विद्यार्थाची टीम या प्रकल्पावर काम करीत असून तो अंतिम टप्प्यात आहे. दोन ते तीन महिन्यांत शेतऱ्यांसाठी एक स्वतंत्र हेल्पलाइनच कार्यान्वित होईल. शेतकऱ्याने त्याच्या गावातून पिकावर पडलेल्या राेगाचा फोटो हेल्पलाइनच्या नंबरवर व्हाॅटसअॅप किंवा साइटवर मेल केला तरी चोवीस तासात कधीही संगणकच शेतकऱ्याला मार्गदर्शन करेल. पिकावरच्या रोगाचे नाव व त्यावरची उपचार पद्धतीही मोफत सांगितली जाईल.

संगणक विभागाचे काम
या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे सॉफ्टवेअरही अत्यंत युजरफ्रेंडली करण्याचे काम सुरू आहे. मधमाशीचे पोळे जसे असते तसे दूरवरून याचे चित्र दिसते. हे काम विद्यापीठाचा संगणकशास्त्र विभाग करीत आहे. हा प्रल्प अंतिम टप्प्यात असून तो लवकरच सर्वांसाठी उपलब्ध होणार आहे.

३९४ जातींचा शोध लावला..
कीटकांच्या शेकडो जाती आहेत. सूक्ष्म आकारात असणाऱ्या कीटकांच्या या जातींचे डिजिटायझेशन हे अत्यंत अवघड ,खर्चिक अन मेहनतीचे काम आहे. संशोधकांनी राज्यभर फिरून ७ हजार कीटकांचे नमुने गोळा केले. त्यावरून तब्बल ३९४ जाती शोधता आल्या. शेतकऱ्यांसाठी हे संशोधन फायद्याचे आहे. कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांच्या प्रोत्साहनामुळे इथवर मजल मारता आली. - डॉ. गुलाब खेडकर, प्रमुख, डीएनए बार कोड सेंटर