औरंगाबाद - चिकलठाणा औद्योगिक वसाहतीतील कन्सेप्ट फार्मा या औषधी कंपनीला महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या (एमपीसीबी) अधिकाऱ्यांनी बुधवारी टाळे ठोकले. मुदतबाह्य झालेली औषधी कंपनीच्या आवारातच पुरताना कर्मचाऱ्यांना रंगेहाथ पकडण्यात आले. हा प्रकार घातक घनकचरा प्रकारात मोडत असल्याचे कारण दाखवत कंपनी तत्काळ बंद करून तिचे वीज पाण्याचे कनेक्शन तोडण्याची कारवाई करण्यात आली. तसेच वाळूज येथील औरंगाबाद ऑटो अॅन्सिलरीज प्रा. लि., गुरुदत्त एंटरप्रायजेस आणि चिकलठाण्यातील फूड्स अँड फीड्स या कंपन्यांनाही टाळे ठोकण्यात आले.
कन्सेप्ट फार्मा ही औरंगाबाद शहरातील चिकलठाणा आैद्योगिक वसाहतीतील जुनी कंपनी आहे. या कंपनीत दीडशे कर्मचारी आहेत. कंपनीविषयी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या प्रादेशिक कार्यालयाकडे अनेक दिवसांपासून तक्रारी येत होत्या. यापूर्वी अधिकाऱ्यांनी तीन नोटिसा देऊन कंपनीच्या आवारातून बाहेर येणाऱ्या सांडपाण्याची व्यवस्था करावी, अशा सूचना केल्या होत्या. मात्र, सांडपाणी प्रकल्पात कंपनीने कोणतीही सुधारणा केली नाही. १३ एप्रिल रोजी प्रदूषण नियंत्रण मंडळाचे विभागीय अधिकारी धनंजय पाटील उपविभागीय अधिकारी आनंद काटोले यांनी कंपनीवर अचानक छापा मारला. या वेळी कर्मचारी मुदतबाह्य औषधींचा साठा कंपनीच्या आवारातीलच खड्ड्यात गाडत असताना रंगेहाथ पकडण्यात आले.
बुधवारी (१३ एप्रिल) सायंकाळी सहाच्या सुमारास कंपनीच्या आवारात जेसीबी मशीनने खड्डा खोदून त्यात बरीच मोठी मुदतबाह्य औषधी पुरली जात होती. त्याच वेळी प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी तेथून जात होते. त्यांनी तत्काळ आपली गाडी थांबवून कंपनीच्या आवारात नेली असता हा गंभीर प्रकार उजेडात आला. त्यामुळे तत्काळ कंपनी बंद करण्याची नोटीस बजावण्यात आली. याअाधी २२ डिसेंबर २०१४ रोजी कंपनीला सांडपाणी प्रकल्प अपग्रेड करण्याची नोटीस पाठवली होती. तसेच एकूण तीन लाखांची बँक गॅरंटीही मागितली होती. मात्र, कंपनीने कोणतीही उपाययोजना केल्याने पुन्हा १५ सप्टेंबर २०१५ ला नोटीस पाठवली होती.
मुदतबाह्यऔषधी म्हणजे घातक घनकचरा : मुदतबाह्यझालेली औषधी हा प्रकार घातक घनकचरा प्रकारात मोडतो. कंपनीच्या आवारात मुदतबाह्य औषधी पुरता येत नाही. त्यासाठी राज्यात तीन कचरा डेपो आहेत. यात पुणे जिल्ह्यातील रांजणगाव, नागपूर मुंबई याच ठिकाणी त्याची विल्हेवाट शास्त्रीय पद्धतीने लावली जाते, असे मंडळाचे प्रमुख धनंजय पाटील यांनी सांगितले.
आमची चूक नाही
अन्न औषधी प्रशासनाच्या नियमानुसार कंपनीच्या आवारात औषधी पुरण्याची कृती चुकीची नाही. प्रदूषण नियंत्रण मंडळाने कारवाई केल्यामुळे आम्ही आता पुणे जिल्ह्यातील रांजणगाव येथे हा कचरा पाठवू. सांडपाणी प्रक्रियेतही सुधारणा करू. - डॉ. नागेश बडवे, अध्यक्ष,कन्सेप्ट फार्मा लि.
औषधी पुरणे हो मोठा गुन्हा
सामूहिक घातक घनकचरा प्रक्रिया विल्हेवाट प्रकल्पातच मुदतबाह्य औषधींची शास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट लावली जाते. ती कंपनीच्या आवारात पुरणे गुन्हा आहे. तसेच औरंगाबाद ऑटो अॅन्सिलरीज, गुरुदत्त एन्टरप्रायजेस फूड्स अँड फीड्स या कंपन्यांनाही प्रदूषित पाणी सार्वजनिक सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाकडे पाठवण्याच्या नोटिसा दिल्या होत्या. मात्र, वारंवार सूचना देऊनही सुधारणा केल्याने कारवाई लागली. - धनंजय पाटील, विभागीयअधिकारी, एमपीसीबी
या तीन कंपन्यांनाही टाळे
कन्सेप्ट फार्मासह प्रदूषण नियंत्रण मंडळाने वाळूज येथील औरंगाबाद ऑटो अॅन्सिलरीज, गुरुदत्त एंटरप्रायजेस चिकलठाणा येथील फूड्स अँड फीड्स या तीन कंपन्यांना टाळे ठोकले. त्यांचीही वीज पाणी कपात करण्याची नोटीस दिली. या तीन कंपन्यांमधून प्रदूषित सांडपाणी आवाराबाहेर जात असल्याचे पाहणीत आढळल्याने ही कारवाई करण्यात आली.