आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोर्चा काढण्याबाबत काँग्रेसमध्ये संभ्रम, प्रदेशाध्यक्ष अशोकराव चव्हाण निर्णय घेणार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - औरंगाबादेत मंत्रिमंडळाची बैठक म्हटली की मोर्चे, निदर्शने यांचा सुकाळ असतो. काँग्रेस आघाडीच्या कार्यकाळात विरोधी बाकांवरील शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाने प्रत्येक वेळी या बैठकीवर मोर्चे काढले. आता काँग्रेस आघाडी विरोधी बाकांवर असल्याने त्यांच्याकडून मोठा मोर्चा काढला जाईल, असे कार्यकर्त्यांना अपेक्षित होते. परंतु प्रत्यक्षात या बैठकीवर मोर्चा काढायचा की नाही, असा संभ्रम काँग्रेसच्या नेत्यांच्या मनात आहे. स्थानिक नेतेही द्विधा मनःस्थितीत असल्याने प्रदेशाध्यक्ष अशोकराव चव्हाण यांच्याशी चर्चा केल्यानंतर काय ते ठरणार असल्याचे प्रदेश सरचिटणीस अरुण मुगदिया यांनी सांगितले. आंदोलन करण्याची सवय नसलेल्या काँग्रेसकडून मोर्चा काढण्यात आला अन् त्याला प्रतिसाद मिळाला नाही तर काय होईल, याच विचाराने ही मंडळी चिंताग्रस्त असल्याचे समजते. तशीच अवस्था राष्ट्रवादी काँग्रेसची आहे.

५-६ किंवा ६-७ ऑक्टोबरला ही बैठक होण्याची शक्यता आहे. आतापर्यंत येथे झालेल्या बैठकांवर मराठवाड्यासह राज्याच्या वेगवेगळ्या भागांतील पक्ष तसेच संघटनांनी मोर्चे काढल्याचा इतिहास आहे. त्यामुळे निर्णयापेक्षाही येथील बैठक मोर्चे, निदर्शनांनीच गाजते. त्यामुळे या वेळी विरोधी पक्ष कशी आंदोलने करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. प्रमुख विरोधी पक्ष काँग्रेस राष्ट्रवादी काय आंदोेलन करतात, याचा अंदाज घेण्याचा प्रयत्न केला असता काँग्रेस अजून संभ्रमावस्थेत असल्याचे दिसून येते. तशीच काहीशी अवस्था राष्ट्रवादीची आहे. राष्ट्रवादी तर मोर्चाच काढणार नसल्याचे सांगण्यात येते. काँग्रेसचे तेवढे अजून ठरलेले नाही. एकूणच या मंत्रिमंडळ बैठकीसमोर मोर्चे तसेच निदर्शनांचा फारसा मारा होणार नसल्याचा अंदाज आहे. अजून समोर आले नसले तरी डावे पक्ष तसेच विविध अराजकीय संघटनांकडून आंदोलनाची तयारी करण्यात येत असल्याचे समजते. या संघटनांना मंत्रिमंडळ बैठकीच्या तारखेची तेवढी प्रतीक्षा लागली आहे.

अजून ठरलेले नाही
मंत्रिमंडळ बैठकीवर मोर्चा काढण्याचे अजून ठरलेले नाही. स्थानिक नेत्यांनी तसे संकेत दिले नाहीत. मुंबईत जाऊन प्रदेशाध्यक्ष अशोकराव चव्हाण यांच्याशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल. त्यामुळे आत्ताच काही सांगता येत नाही. -अरुण मुगदिया, प्रदेश सरचिटणीस.

फायदा नाही
आम्ही जेलभरो आंदोलन केले, गावोगाव फिरलो; पण युती सरकारला काही जाग येत नाही. त्यामुळे मंत्रिमंडळ बैठकीवर मोर्चा काढण्यातून काही निष्पन्न होईल, असे वाटत नाही. हे कुंभकर्णी सरकार आहे. त्यांना निवडणुकीतच जागे करू. -आ. भाऊसाहेब पाटील चिकटगावकर, जिल्हाध्यक्ष,राष्ट्रवादी.