आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराऔरंगाबाद- भारतीय जनता पक्ष (भाजप) हिंदूस्तानातून कॉंग्रेसला संपविण्याची भाषा करत आहे. परंतु कॉंग्रेस हा केवळ राजकीय पक्ष नसून एक विचारप्रवाह असल्याचा भाजपला विसर पडला आहे. भाजपने पुन्हा भारताचा इतिहास वाचावा. त्यांचा इतिहास कच्चा दिसतोय, अशा शब्दांत कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी टीका केली.
राहुल गांधी दोन दिवसांच्या महाराष्ट्र दौर्यावर आले आहेत. लोकसभा निवडणुका जाहीर झाल्यानंतर राहुल गांधी यांची ही पहिलीच सभा ठरली आहे. शहरातील मराठवाडा सांस्कृतिक क्रीडा मंडळाच्या मैदानावर आज (बुधवार) दुपारी आयोजित केलेल्या जाहीर सभेला त्यांनी संबोधित केले.
राहुल गांधी म्हणाले, कॉंग्रेसचा हा विचार राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतिक आहे. कुराण, गीता या धर्मग्रंथांमध्येही हेच सांगण्यात आले आहे. गुरुनानक आणि राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनीही हिंदूस्तानाला एकात्मतेची शिकवण दिली आहे.
भाजप नेत्यांनी गीता वाचलीच नसल्याचे सांगून राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदी यांचा नामोल्लेख न करता त्यांच्यावर चांगलेच तोंडसुख घेतले.
विचारप्रवाहाच्या जोरावर कॉंग्रेसने ब्रिटिशांना 'चले जाव' असे सांगितले होते. कॉग्रेसने ब्रिटिशांनी हातमिळवणी केली नव्हती तर त्यांना प्रेमाने हिंदूस्थानातून घालवले होते. त्याचप्रमाणे भाजपलाही हिंदूस्तानातून घालविले जाईल, असेही राहुल गांधी यांनी सांगितले.
राज्याच्या औद्योगिक विकासाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा दिल्ली-मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉरचा (डीएमआयसी) पहिला टप्पा मार्गी लागला आहे. राज्य आणि केंद्र सरकारदरम्यान सहकार्य करारावर नुकत्याच स्वाक्षर्या करण्यात आल्या आहेत. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे औरंगाबादसह राज्यातील अहमदनगर, नाशिक, नंदुरबार, धुळे, ठाणे, रायगड आणि पुणे या आठ जिल्ह्यांतील औद्योगिक विकासाला चालना मिळणार आहे. औरंगाबाद जिल्ह्यात डीएमआयसीमुळे सव्वातीन लाखांच्या वर नव्या रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या जाणार असल्याचेही राहुल गांधी यांनी सांगितले.
राहुल यांच्यासमवेत राज्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण होते. सभेचे विशेष म्हणजे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण आणि शिवाजीराव पाटील निलंगेकर या दोघांना व्यासपीठावर स्थान देण्यात आले होते. सभेला महाराष्ट्राचे प्रभारी मोहन प्रकाश, प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, संसदीय कामकाज मंत्री हर्षवर्धन पाटील, शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा, राज्यमंत्री डी. पी. सावंत, माजी राज्यमंत्री अब्दुल सत्तार, जिल्हाध्यक्ष केशवराव औताडे, शहराध्यक्ष अँड. सय्यद अक्रम आदी उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.