आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्हाध्यक्षपदासाठी डॉ. काळे, सत्तार, झांबड चर्चेत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - गेल्या एक दशकापासून काँग्रेसचे जिल्हाध्यक्षपद सांभाळणारे केशवराव औताडे यांचा उत्तराधिकारी लवकरच निश्चित केला जाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यांचा वारदास म्हणून जिल्ह्यातील माजी आमदार डॉ. कल्याण काळे, आमदार तथा माजी मंत्री अब्दुल सत्तार आमदार सुभाष झांबड अशी तगडी नावे पुढे आली आहेत.

प्रदेशाध्यक्ष अशोकराव चव्हाण हे आपली नवी टीम लवकरच जाहीर करणार असून त्यात औरंगाबादचे जिल्हा शहराध्यक्ष बदलले जाणार आहेत. शहराध्यक्षपदासाठी वेगवेगळी नावे चर्चेत असतानाच जिल्हाध्यक्षपदासाठी मोजकीच तीन नावे समोर येत आहेत. यात सत्तार यांचे पारडे जड असल्याचे बोलले जाते. कारण सत्तार हे चव्हाण यांचे निकटवर्तीय समजले जातात. दुसरीकडे मराठा चेहऱ्याचा विचार झाल्यास डॉ. काळे यांचे नाव पुढे येते. डॉ. काळे हे दोन वेळा आमदार राहिले असून त्यांचा जिल्ह्याचा चांगला अभ्यास आहे. डॉ. काळे सत्तार हे अध्यक्ष झाल्यास आपल्या मतदारसंघाला जास्त वेळ देतील. अख्खा जिल्हाच ज्यांच्या मतदारसंघात येतो, अशा आमदार झांबड यांचा पर्याय म्हणून विचार होऊ शकतो. त्यांनी स्वत: हे पद नको असल्याचे श्रेष्ठींना सांगितल्याचे समजते. जिल्हाध्यक्षपदाचा फायदा त्यांना त्यांच्या औरंगाबाद-जालना स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत होऊ शकतो. त्यामुळे ते या पदासाठी स्पष्ट नकार देणार नाहीत, असे त्यांच्या समर्थकांचे म्हणणे आहे.

सुभाष झांबड
औरंगाबाद-जालना स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील उमेदवार. दोन्ही जिल्ह्यांत त्यांना फिरावे लागते. हे पद दिल्यास त्यांची दोन्हीही कामे होतील, असा होरा. पक्षातील सर्वच नेत्यांशी संबंध. अमुक एका गटाचा असा अजून शिक्का नाही. फिरण्याचा आवाका आहे. त्यामुळे त्यांचा विचार होऊ शकतो. मात्र स्थानिक पदाधिकारी त्यांना कितपत स्वीकारतील, अशी शंका.

डॉ. कल्याण काळे
दोनवेळा फुलंब्रीचे आमदार. माजी मुख्यमंत्री स्व. विलासराव देशमुख यांचे निकटवर्तीय समजले जात. अशोकरावांशी फारशी सलगी नाही. त्यामुळे ते मागे पडू शकतात. मात्र या पदावर बहुजन चेहराच असावा यावर एकवाक्यता झाल्यास ते एकमेव दावेदार आहेत.

अब्दुल सत्तार
एक वेळा स्थानिक स्वराज्य संस्था तर दुसऱ्यांदा सिल्लोडचे आमदार. जिल्हाभरात वावर. चव्हाण यांचे कट्टर समर्थक. चव्हाण यांच्यामुळेच ते मंत्री होऊ शकले. त्यामुळे जिल्हाध्यक्ष होण्यास त्यांना कोणताही अडथळा नाही. मात्र जिल्हाध्यक्ष बहुजन असावा, अशी मागणी असल्याने ते मागे पडू शकतात.