आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Congress District Chief Sattar Eyes On Gandhi Bhavan

जिल्हाध्यक्ष होताच सत्तार यांचा गांधी भवनावर डोळा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्याशी असलेल्या संबंधांचा वापर करत सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार हे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष झाले. त्यानंतरच्या पक्षाच्या पहिल्याच कार्यक्रमात त्यांनी ‘गांधी भवन’ या पक्षाच्या जिल्हा शहर कार्यालयाचे भविष्यात काय होणार याचे संकेत दिले. तळमजल्यावर भाड्याने दिलेले सर्व गाळे ताब्यात घेऊन तेथे पक्ष पदाधिकाऱ्यांसाठी दालने करणार असल्याचे सत्तार यांनी स्पष्ट केले.

जिल्हा शहर काँग्रेसच्या वतीने नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार समारंभ सोमवारी गांधी भवनात आयोजित करण्यात आला होता. या वेळी बोलताना सत्तार यांनी भविष्यात गांधी भवन हे केवळ पक्ष आणि पक्षाचेच असेल असे स्पष्ट केले. यापूर्वीचे जिल्हाध्यक्ष केशवराव औताडे यांनी गांधी भवन पूर्णपणे पक्षाच्या ताब्यात घेण्याचे ठरवले होते. परंतु ते शक्य झाले नाही. खंडणी मागितली म्हणून त्यांच्या विरोधात एकाने तक्रार दिली होती. मात्र आता सत्तार स्वत: कामाला लागले असून गांधी भवन भाडेकरूंच्या ताब्यातून मोकळे करत त्यावर फक्त पक्षाचाच अधिकार असेल, असे नियोजन करण्यात येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. काँग्रेसच्या जिल्ह्याचा ताबा सत्तार यांनी घेतल्यानंतर आता त्यांचा डोळा गांधी भवनावर असल्याचे या निमित्ताने स्पष्ट झाले.

गांधी भवनात दुपारी झालेल्या या सोहळ्यासाठी नूतन शहराध्यक्ष नामदेव पवार, नूतन प्रदेश उपाध्यक्ष केशवराव औताडे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष श्रीराम महाजन, सरचिटणीस आमदार सुभाष झांबड, अरुण मुगदिया, चिटणीस अशोक सायन्ना, समशेरसिंग सोधी, देवगिरी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन जगन्नाथ काळे, अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष एम.एम. शेख, माजी शहराध्यक्ष अॅड. सय्यद अक्रम, माजी आमदार डॉ. कल्याण काळे, इब्राहिम पठाण उपस्थित होते. शहराध्यक्षपदाच्या शर्यतीत असलेले चेहरे मात्र येथे दिसले नाहीत.

गांधी भवनाचे निर्माण करतानाच पक्षाच्या कार्यालयाबरोबरच कार्यकर्त्यांची आर्थिक सोय व्हावी म्हणून गाळे बांधण्यात आले होते. आता हे गाळे पोटभाडेकरूंच्या ताब्यात असून ते भाडेही देत नाहीत. जे कोणी भाडे देतो ती रक्कम एक वेळच्या जेवणाच्या बिलापेक्षाही कमी आहे. तेव्हा ही इमारत नव्याने बांधण्याचा प्रस्ताव पुढे आला होता. परंतु त्याला मूर्तस्वरूप येऊ शकले नाही.

गांधी भवनातील दुकाने, अतिक्रमणे काढून तिथे पदाधिकारी, कार्यकर्त्यांना बैठका घेण्यासाठी कार्यालय करण्याचा मनोदय सत्तार यांनी या वेळी व्यक्त केला. प्रत्येक आठवड्याला शहरातील पदाधिकारी, तालुकाध्यक्ष तसेच कार्यकर्त्यांच्या येथे बैठका होतील, स्वत: जिल्हाध्यक्ष व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सर्वांशी संवाद साधतील, असे नियोजन असल्याचे सत्तार यांनी सांगितले.

जुन्या पदाधिकाऱ्यांना निमंत्रणच नाही
सत्तार यांनी जिल्हाध्यक्षपदाबरोबरच जिल्ह्याच्या काँग्रेसचाही ताबा घेतल्याचे या निमित्ताने दिसून आले. आपल्याच मर्जीतील पदाधिकाऱ्यांना या सोहळ्याचे निमंत्रण देण्यात आले होते. महानगरपालिकेतील माजी पदाधिकाऱ्यांना या कार्यक्रमापासून मुद्दाम दूर ठेवण्यात आल्याचे माजी पदाधिकाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे नवीन नियुक्त्या झाल्यानंतर पक्षात नाराजी असल्याचे दिसून आले. काँग्रेसचे शहरातील माजी नगरसेवकही या कार्यक्रमात दिसले नाहीत.

अॅड. अक्रम यांचा उद्धार करण्याची मागणी
सतत सहा वर्षे शहराध्यक्षपदी असलेले अॅड. सय्यद अक्रम यांचे पुनर्वसन करण्यात यावे, असा अजब ठराव प्रभाकर मते पाटील यांनी ठेवला. त्यांच्यामुळे शहरातील काँग्रेस जिवंत राहिल्याचा उल्लेख सत्तार यांनी केला. अक्रम यांना प्रदेश पातळीवर स्थान देण्यात यावे, अशी मागणी प्रस्तावात करण्यात आली.

नवीन इमारत उभारण्याचा विचार
दरम्यान, गांधी भवनाची जुनी इमारत पाडून तेथे नवीन इमारत बांधण्याचा विचार असून तसा प्रस्ताव प्रदेश पातळीवर पाठवण्यात आल्याचे नुतन शहराध्यक्ष नामदेव पवार यांनी सांगितले. नव्याने बांधकाम झाल्यास इमारतीत सर्व प्रकारच्या सुविधा येथे देता येतील, पक्षाला भविष्यात अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करायचा आहे. त्याचाही विचार करण्यात येत असल्याचे पवार यांनी स्पष्ट केले. यासंदर्भात वरिष्ठ पातळीवर लवकरच निर्णय घेण्यात येणार आहे.
छायाचित्र: प्रदेश उपाध्यक्ष केशवराव औताडे, आमदार सुभाष झांबड यांचा सत्कार करताना जिल्हाध्यक्ष अब्दुल सत्तार.