आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

देशमुखांच्या काळात खरी काँग्रेस, आताचे नेते लाचार, काँग्रेस जिल्हाध्यक्ष औताडेंचा आरोप

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(विलासराव देशमुख यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करताना काँग्रेस जिल्हाध्यक्ष केशवराव औताडे, सुभाष झांबड, डॉ. कल्याण काळे, माजी आमदार एम. एम. शेख, शहराध्यक्ष अॅड. सय्यद अक्रम, प्रदेश कमिटीचे प्रकाश मुगदिया, चंद्रभान पारखे, राजकुमार जाधव)
औरंगाबाद- राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा मराठवाड्याचे भूमिपुत्र स्व. विलासराव देशमुख यांच्या कार्यकाळात खरी काँग्रेस होती. तेव्हा पक्षाच्या कार्यकर्त्याला मान होता. परंतु आताचे नेते लाचार आहेत. ते पक्षहिताचे निर्णय घेऊ शकत नाहीत, अशा शब्दांत काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष केशवराव औताडे यांनी स्वकीयांवरच आरोप केले. स्व. देशमुख यांच्या जयंतीनिमित्त शहागंज येथील गांधी भवनात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षपद सध्या मराठवाड्याचे दुसरे नेते अशोकराव चव्हाण यांच्याकडे आहे. तरीही औताडे यांनी असे वक्तव्य केल्याने औताडे हे चव्हाण यांच्या विरोधात तर नाहीत ना, अशी चर्चा या निमित्ताने सुरू झाली आहे. सकाळी ११ वाजता काँग्रेसच्या वतीने स्व. देशमुख यांना अभिवादन करण्यासाठी गांधी भवनात विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यात औताडे यांच्यासह आमदार सुभाष झांबड, माजी आमदार एम. एम. शेख, शहराध्यक्ष अॅड. सय्यद अक्रम, प्रदेश कमिटीचे प्रकाश मुगदिया, चंद्रभान पारखे, राजकुमार जाधव, डॉ. पवन डोंगरे यांच्यासह पालिकेतील नवनियुक्त नगरसेवक उपस्थित होते.
या वेळी बोलताना मान्यवरांनी स्व. देशमुख यांच्या कार्याचे कौतुक केले. त्यांनी मराठवाडा तसेच विविध समाजांना केलेली मदत अन्य कोणत्याही नेत्याने केली नसल्याचे सांगण्यात आले. समारोपात बोलताना औताडे यांनी "स्व. देशमुख हेच खरे नेते होते. ते प्रत्येक नेत्याची काळजी घेत. त्यांच्या काळात काँग्रेस बळकट झाली. आताचे नेते हे वरिष्ठ तसेच अन्य पक्षांसमोर लाचार होतात,' अशी टीका केली. याप्रसंगी इब्राहिम पठाण, गटनेते भाऊसाहेब जगताप यांची भाषणे झाली. विलासरावांच्या तैलचित्रास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी मनोज पाटील, किरण डोणगावकर, विनोद तांबे, प्रकाश वाघमारे, गुलाब पटेल, राजकुमार जाधव, सलीम कादरी, योगेश मसलगे, इंटक नेते सुभाष देवकर, सुनीता कुदळे, वैशाली वैद्य, दादाराव कुबेर, आत्माराम पळसकर, जनार्दन निकम, ताराचंद काळे, अशोक गेहलोत, केसरभाई आदींची उपस्थिती होती. सूत्रसंचालन राजेंद्र दाते यांनी केले.
बातम्या आणखी आहेत...