आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबाद मध्य मतदारसंघ काँग्रेसला सोडण्याची तयारी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - आगामी विधानसभा निवडणुकीत औरंगाबाद जिल्ह्यावर लक्ष केंद्रित करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने पावले उचलली आहेत. त्याचाच एक भाग म्हणून वैजापूर, कन्नड मतदारसंघावर दावा करण्याच्या हालचाली होत आहेत. या दोन्ही मतदारसंघांच्या मोबदल्यात औरंगाबाद मध्यवर पाणी सोडण्याची तयारी राष्ट्रवादीने केली आहे.

विधानसभेची तयारी करत असलेल्या राष्ट्रवादीने प्रत्येक जिल्ह्यासाठी वेगळी व्यूहरचना सुरू केली आहे. औरंगाबादचे संपर्कमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले की, पैठणची जागा आमच्याकडे आहेच. त्यात आणखी दोन मतदारसंघांची भर टाकावी लागणार आहे. त्या दृष्टिकोनातून कन्नड आणि वैजापूरच्या मोबदल्यात औरंगाबाद मध्य मतदारसंघ काँग्रेसला सोडण्यावरही विचार होत आहे.

कसे आहे मतांचे गणित : 2009 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत कन्नड मतदारसंघात (मनसेबाहेर पडलेले) हर्षवर्धन जाधव यांना 46,106, त्या वेळी अपक्ष आणि आता राष्ट्रवादीत असलेले उदयसिंह राजपूत यांना 41,909, तर काँग्रेसच्या भरतसिंह राजपूत यांना फक्त 22 हजार मते मिळाली होती. पक्षाचे पाठबळ असल्यास राष्ट्रवादीचा उमेदवार तेथे आता विजयी होऊ शकतो. शिवसेनेचे आर. एम. वाणी यांना 51,379, तर त्या वेळी अपक्ष आणि आता राष्ट्रवादीत असलेले भाऊसाहेब पाटील चिकटगावकर यांना 50,154 मते मिळाली होती. काँग्रेसचे डॉ. दिनेश परदेशी यांच्या पदरात सुमारे 40 हजार मते पडली होती. त्यामुळे तेथेही राष्ट्रवादीचाच उमेदवार विजयी होऊ शकतो, असे गणित आहे. दुसरीकडे मध्य मतदारसंघातील गणिते लक्षात घेता राष्ट्रवादीला हमखास यशाची चिन्हे नाहीत. त्यामुळेच हा मतदारसंघ काँग्रेसला सोडावा, असा काही पदाधिकार्‍यांचा सूर आहे.