आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Congress Gives Ticket To Ashok Chavan News In Marathi

‘आदर्श’चे सावट, तरीही अशोकरावांना नांदेडमध्ये उमेदवारी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - भ्रष्टाचाराच्या मुद्दय़ावरून काँग्रेसने सुरेश कलमाडी यांना पुण्याची उमेदवारी नाकारली, परंतु नांदेडमध्ये मात्र आदर्श घोटाळ्याचा ठपका असलेले माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्याच गळ्यात माळ घालण्यात आली आहे. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनीच अशोकरावांच्या उमेदवारीसाठी र्शेष्ठींकडे आग्रह धरला होता. भाजपचे उमेदवार डी.बी. पाटलांशी अशोकरावांची लढत आहे.

नांदेड वगळता राज्यातील काँग्रेसचे सर्वच उमेदवार जाहीर झाले होते. नांदेडात 17 एप्रिलला मतदान असून, उमेदवारीसाठी बुधवारी अखेरचा दिवस आहे. त्यातच मंगळवारी रात्री पक्षाचे सरचिटणीस अजय माकन यांनी अशोकरावांचे नाव जाहीर केले.

दरम्यान, चव्हाण यांच्या पत्नी अमिता आणि पालकमंत्री डी.पी. सावंत यांनी मंगळवारीच आपले उमेदवारी अर्ज दाखल केले होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अशोकरावांना लोकसभेची तयारी करण्याची सूचना र्शेष्ठींकडून मंगळवारीच मिळाली होती.

खासदार भास्करराव खतगावकर यांनी अशोकरावांसाठी जागा सोडत असल्याचे गेल्या आठवड्यात र्शेष्ठींना कळवले. त्यामुळे चव्हाणांपुढे पक्षांतर्गत आव्हान नव्हते.

भोकर खतगावकरांना!
अशोकरावांचा भोकर विधानसभा मतदारसंघ त्यांच्यासाठी हुकमी एक्का आहे. मतदारसंघात फिरकले नाही, तरी ते निवडून येऊ शकतात. लोकसभेसाठी त्यांनी आग्रह धरला तेव्हा खासदार खतगावकरांनी आपल्याला भोकरमधून विधानसभेत पाठवा, अशी अट घातली होती. खतगावकरांना त्यागाचे फळ मिळेल किंवा काय, हे काळच सांगेल.

रविवारी मोदी नांदेडमध्ये
भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी रविवारी, 30 मार्च रोजी राज्यात आहेत. नांदेडातील पक्षाचे उमेदवार डी.बी. पाटील यांच्या प्रचारार्थ दुपारी 12 वाजता मोदींची सभा आहे. तत्पूर्वी, सकाळी 9.30 वाजता अकोला येथे संजय धोत्रे यांच्या प्रचारार्थ सभा होईल, अशी माहिती भाजपचे राज्य प्रवक्ता शिरीष बोराळकर यांनी दिली आहे.