आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Congress Internal Politics Rajendra Darda Vs Abdul Sattar

पक्ष कार्यालयात न येणार्‍यांची पदे काढा, राजेंद्र दर्डांचे नाव टाळत आमदार सत्तार यांची मागणी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - पक्ष कार्यालय असलेल्या गांधी भवनातील कार्यक्रमाला येत नाहीत, अशा सर्वांची पदे काढून घ्या, पैसा,गाडी काय कामाची? त्याऐवजी सामान्य कार्यकर्त्याला न्याय द्या, अशी मागणी माजी राज्यमंत्री आणि सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार यांनी शनिवारी गांधी भवनात झालेल्या जिल्हा काँग्रेस समितीच्या बैठकीत केली. तुम्ही फक्त कारवाई करा, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत, असेही स्पष्ट केले. सत्तार यांचा रोख औरंगाबाद (पूर्व)चे आमदार तथा शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांच्याकडे होता; परंतु त्यांनी कोणाचाही नामोल्लेख केला नाही. दर्डा गांधी भवनात येत नाहीत, असा आरोप यापूर्वीही झाला आहे.

मराठवाड्यातील 8 लोकसभा मतदारसंघातील संभाव्य उमेदवारांचा आढावा घेण्याबरोबरच काँग्रेसच्या वतीने दुष्काळाच्या काळात केलेल्या कामांचा आढावा घेण्यासाठी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे सोमवारी शहरात येत आहेत. हडकोतील मौलाना आझाद संशोधन केंद्राच्या सभागृहात ते कार्यकर्त्यांशी संवाद साधणार असून या मेळाव्याच्या तयारीसाठी काँग्रेसच्या वतीने शनिवारी गांधी भवनात बैठक बोलावली होती. त्या वेळी सत्तार बोलत होते. प्रदेश सरचिटणीस अरुण मुगदिया, जिल्हाध्यक्ष केशवराव औताडे, शहराध्यक्ष अँड. सय्यद अक्रम, आमदार डॉ. कल्याण काळे, एम. एम. शेख व अब्दुल सत्तार, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा नाहेदाबानो पठाण, माजी खासदार उत्तमसिंह पवार, इब्राहीम पठाण, विनायक बोरसे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

सत्तार म्हणाले, आपल्याकडे प्रचंड पैसा, गाड्या आहेत. दिल्लीशीही संबंध आहेत. त्यामुळे गांधी भवनात जाण्याची गरज पडत नाही, अशी काहींची भावना आहे म्हणूनच ते इकडे फिरकत नाहीत. अशांना पदे देण्याऐवजी सामान्य कार्यकर्त्याला पदे देण्यात यावीत, मी आदेश देऊ शकत नाही, पण एक सामान्य कार्यकर्ता म्हणून जिल्हाध्यक्षांकडे सूचना करू शकतो. तुम्ही फक्त कारवाई करा, आम्ही पाठीशी आहोत. त्या वेळी त्यांचा रोख दर्डा यांच्यावर होता. त्याचबरोबर आपल्या म्हणण्याचा विपर्यास होऊ नये म्हणजेच क्वचित हजेरी लावणारे डॉ. काळे यांच्याविषयी वक्तव्य असल्याचे जाणवू नये म्हणून त्यांनी खबरदारी घेत लगेच खुलासा केला. ते म्हणाले, डॉ. काळे नसले तरी त्यांचे बंधू जगन्नाथ काळे सर्वत्र हजेरी लावतात. त्यामुळे त्यांच्या मतदारांनाही डॉ. काळे यांची गरज भासत नाही,असेही ते म्हणाले.


पक्षामुळे मिळाली पदे
4पक्षापेक्षा कोणी मोठा नाही. मी कोणाचे नाव घेतलेले नाही. मंत्री, आमदार, खासदार कोणीही असो. पक्ष कार्यालयात येत नाहीत, त्यांचे पद काढून घेतले पाहिजे. दिल्लीशी संबंध आहे म्हणून पक्ष कार्यालयात न येणे ही गोष्ट पक्षासाठी चांगली नाही. पक्ष आहे म्हणून पदे आहेत, याचा विसर पडू नये. जिल्हाध्यक्षांनी निर्णय घ्यावा. अब्दुल सत्तार, आमदार

वेगवेगळ्या जाहिराती का ?
प्रत्येक वेळी काँग्रेसचे कार्यकर्ते वेगवेगळ्या जाहिराती देतात. पक्षाची एक जाहिरात कोठे दिसत नाही. यापुढे असे न करता पक्षाच्या वतीने एकच जाहिरात द्यावी. जेणेकरून चांगला संदेश जाईल, असा दावा त्यांनी केला. जे पैसे देतील त्यांचा फोटो मोठा, तर जे देणार नाहीत त्यांचा लहान फोटो छापावा, असाही हसत सल्लाही त्यांनी दिला.

सर्वांनीच दिले कामाला लागण्याचे आदेश
शहराध्यक्ष, जिल्हाध्यक्ष, आमदार अब्दुल सत्तार, डॉ. कल्याण काळे, उत्तमसिंग पवार या मंडळींची भाषणे झाली. निवडणुका जवळ आल्याने कामाला लागले पाहिजे, असे आदेश या सर्वच वक्त्यांनी दिले. दुष्काळाच्या कामात औरंगाबाद जिल्ह्यात 27 कोटी रुपये सिमेंट बंधार्‍यांसाठी, तर 14 कोटी रुपये शेततळ्यांसाठी शासनाकडून आणण्यात आले होते. पक्षाने चांगले काम केले असल्याचे मार्केटिंग काँग्रेस कार्यकर्त्यांनी करण्याची गरज असल्याचे डॉ. काळे यांनी सांगितले, तर औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यातील लोकसभा पराभवाला आपण सर्वच जबाबदार असल्याचे सत्तार म्हणाले. बूथवर कार्यकर्तेच नसतात, अशी टीकाही त्यांनी केली.
निवडणुकीचे लागले वेध
गांधी भवनात काँग्रेसच्या जिल्हा कमिटीची बैठक दरमहा होते. जिल्हाध्यक्ष, शहराध्यक्षांशिवाय मोजून 8- 10 कार्यकर्ते बैठकीला उपस्थित असतात. मात्र, आता निवडणुकीचे वेध लागल्याने शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा वगळता सर्व मुख्य लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.