आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इशारा: काँग्रेस मंत्री, आमदारांच्या घरांवर धडकणार स्वकीय

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- कार्यकर्त्यांच्या समस्या सोडवण्यात जिल्ह्यातील मंत्री, आमदारांना अपयश येत असल्याने जिल्ह्यातील काँग्रेस आमदारांच्या घरांवर स्वकीय कार्यकर्तेच चाल करून जातील, असा इशारा जिल्हाध्यक्ष केशवराव औताडे यांनीच दिला. कार्यकर्तेच काँग्रेसचे प्राण आहेत. त्यांची एकही समस्या, व्यथा राहता कामा नये, अन्यथा आम्ही तुमच्या घरांवर धडकू आणि मुख्यमंत्र्यांकडेही तक्रार करू. मंत्री, आमदारकीपेक्षा पक्ष मोठा आहे याचे भान ठेवा, अशा शब्दांत औताडे यांनी काँग्रेस आमदारांना आज गांधी भवनातील बैठकीत सुनावले.

काँग्रेसचे तालुकाध्यक्ष आणि विविध सेलच्या बैठकीत औताडे बोलत होते. या वेळी डॉ. कल्याण काळे आणि एम. एम. शेख हे दोन आमदार उपस्थित होते. औरंगाबाद पूर्वचे आमदार तथा शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा, सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार हे बैठकीला उपस्थित नव्हते. आपल्या कार्यकर्त्यांना आपलेच मंत्री-आमदार विचारत नाहीत, सच्चा कार्यकर्ता आजही फाटक्या चपलेने फिरतो, आमदार भेटत नाही, समस्या-व्यथा जाणून घेत नाहीत, अशा तक्रारी उपस्थित पदाधिकार्‍यांनी दोन आमदारांसमक्ष केल्या. त्यानंतर औताडे यांनी आमदारांना हा दम भरला. जनतेच्या तक्रारी सोडवण्यासाठी तुमच्यासोबत, मुख्यमंत्र्यांसोबत जाण्याची आमची इच्छा असते. मात्र, तुम्हीच कार्यकर्त्यांच्या समस्या सोडवणार नसाल तर आम्ही तुमच्याशिवाय मुख्यमंत्र्यांकडेच काय, आणखी वरही जाऊ आणि तुमच्याही तक्रारी करू. तुमच्या पदांपेक्षा पक्ष मोठा आहे याचे भान असले पाहिजे. पुढच्या बैठकीत कार्यकर्त्यांची तक्रार कानी यायला नको, असेही त्यांनी सुनावले. काँग्रेस कार्यकर्ता सांगेल ती कामे झालीच पाहिजेत. त्यात कारणे चालणार नाहीत, असा दमही त्यांनी भरला.

औताडे आमदारांना सुनावत असताना डॉ. काळे आणि शेख शांतपणे ऐकत होते. आम्ही सर्वजण मिळून कार्यकर्त्यांच्या तक्रारींचा निपटारा करू. घरावर चालून येण्याची वेळ येऊ देणार नाही, अशी ग्वाही लगेचच डॉ. काळे व शेख यांनी दिली.

बैठकीत मार्गदर्शन करताना केशवराव औताडे. शेजारी एम. एम. शेख, डॉ. कल्याण काळे.

महामंडळाच्या नियुक्त्या कधी करता ?
काँग्रेसकडे असलेल्या तीन महामंडळ अध्यक्षांच्या नियुक्त्या करण्यात आलेल्या नाहीत. त्या कधी करणार, असा सवाल औरंगाबाद तालुकाध्यक्ष भाऊसाहेब कोळगे यांनी केला. नियुक्त्या केल्या तर तीन कार्यकर्त्यांची तडजोड होईल, असा सल्लाही त्यांनी दिला. राष्ट्रवादीने त्यांच्या वाट्यातील महामंडळावर कार्यकर्त्यांची वर्णी लावली आहे. त्यांची सोय झाली, आमचे काय, असा त्यांचा सवाल होता. मात्र यावर औताडे किंवा अन्य कोणी भाष्य केले नाही.

तक्रारी चांगल्या नाहीत
मंत्री, आमदार कार्यकर्त्यांच्या अडचणी सोडवत नाही अशा तक्रारी पक्षासाठी चांगल्या नाहीत. कोणत्याही पदांपेक्षा पक्ष मोठा आणि पक्ष हा कार्यकर्त्यांमुळे चालतो. त्यांच्या समस्या सोडवल्या गेल्या पाहिजेत. तसे झाले नाही तर आम्हीच तुमच्या घरांवर चालून येऊ, अशी तंबी मी जिल्ह्यातील सर्व मंत्री, आमदारांना दिली आहे. आमचा पक्ष शिस्तीचा आहे. तशी वेळ येऊ दिली जाणार नाही, अशी अपेक्षा आहे.
- केशवराव औताडे, जिल्हाध्यक्ष, काँग्रेस.

संस्कृतीनुसार आदरातिथ्य
आमचे सहकारी मंत्री आणि जिल्ह्यातील अन्य आमदार मिळून कार्यकर्त्यांच्या समस्या सोडवू. आमच्या घरी चालून येण्याची वेळ त्यांच्यावर येऊ दिली जाणार नाही. कार्यकर्ते घरी आले तर आपल्या संस्कृतीनुसार त्यांचे आदरातिथ्य होईल.
- डॉ. कल्याण काळे, आमदार.