आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘त्या’ काँग्रेस व्यापाऱ्यांचा परवाना अखेर निलंबित

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वैजापूर - मका खरेदीतून बाजार समितीची मार्केट फी भरण्यास ठेंगा दाखवणाऱ्या काँग्रेस व्यापाऱ्यांचा परवाना तडकाफडकी निलंबित करण्याचा ठराव पारित करण्यावरून बाजार समितीच्या संचालक मंडळाची मासिक सभा मतभेदांनी चांगलीच गाजली.
 
सत्ताधारी शिवसेना गटाच्या संचालकांनी परवाना निलंबित करण्यावर घेतलेल्या ठाम भूमिकेला काँग्रेस- राष्ट्रवादी गटाच्या विरोधी संचालकांनी व्यापाऱ्यांचे परवाने निलंबित केल्यास बाजार समितीच्या आर्थिक उत्पन्नात घट येईल, असा कळीचा मुद्दा प्रतिष्ठित करून ठरावाला कडाडून विरोध केला होता.  विषयावर ठामपणाने अडून बसलेल्या दोन्ही संचालकांनी मतदान घेण्याचा तोडगा सुचवला होता. 
 
दोन्ही गटांनी सर्वानुमते तो मान्य केल्यानंतर घेण्यात आलेल्या मतदानात  सत्ताधारी गटाची बहुमताने अकरा विरुद्ध पाच अशा बहुमताने सरशी झाली. ठरावावर कडाडून विरोध करण्यावर आक्रमक झालेल्या विरोधी गटातील व्यापारी संचालकांनी यू टर्न घेत सत्ताधारी गटाच्या पारड्यात कौल टाकल्यामुळे विरोधकांत या प्रश्नावर उभी फूट पडल्याचे समोर आले. मार्केट फीची रक्कम भरण्यास टाळाटाळ करणाऱ्या व्यापाऱ्यांचा परवाना निलंबित करण्याच्या मुद्द्यावरून सत्ताधारी विरुद्ध विरोधी गटात चांगलेच मतभेद या 
सभेत झाले. 
 
सत्ताधारी गटाचे सभापती काकासाहेब पाटील, ज्येष्ठ संचालक यांच्यासह दहा संचालकांनी हा ठराव घेण्यावर जोर दिला होता. मात्र, विरोधी गटाचे संचालक ज्ञानेश्वर जगताप, सुरेश तांबे, राजेंद्र कराळे, रिखबचंद पाटणी, बाबासाहेब गायकवाड, कैलास बोहरा यांनी एकाच व्यापाऱ्यांवर ही कारवाई का करण्यात येत आहे, असा प्रश्न उपस्थित केला.

अखेर डिके यांचा परवाना निलंबित
वैजापूर बाजार समितीचे परवानाधारक मका खरेदीदार काँग्रेस व्यापारी सारंगधर डिके यांनी लिलावाव्यतिरिक्त खरेदी केलेल्या मक्याची बाजार समितीकडे मार्केट फीचा भरणा न करता रक्कम वसुलीसाठी गेलेल्या कर्मचाऱ्यांना दादागिरी केली. त्यामुळे व्यापारी  डिके यांच्या साई ट्रेडिंग कंपनीचा परवाना निलंबित करण्याचा ठराव बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या मासिक सभेत बहुमताने मंजूर करण्यात आला आहे.
 
बातम्या आणखी आहेत...