आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Congress Mission Sixty Plus, Decision In Municipal Corporation Election Planning

काँग्रेसचे ‘मिशन सिक्स्टी प्लस’, बैठकीत ठरले महानगरपालिका निवडणुकीचे नियोजन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - पालिका निवडणुकीत उमेदवार मिळतील की नाही, अशी शंकी होती. मात्र, उमेदवारांनी उदंड प्रतिसाद दिल्याने काँग्रेसमध्ये कमालीचा उत्साह असून आता या पक्षाने थेट ६० पेक्षा जास्त जागा जिंकण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. पक्षाच्या प्रदेश पार्लमेंटरी बोर्डाची बैठक नुकतीच मुंबईत झाली. त्यात ६० पेक्षा जास्त जागा जिंकण्याचे ठरले असल्याचे आमदार सुभाष झांबड यांनी सांगितले. त्याचबरोबर ‘मिशन सिक्स्टी प्लस’ यशस्वी होईल, असा दावाही त्यांनी केला.

लोकसभेपाठोपाठ विधानसभा निवडणुकीत दारुण पराभव झाल्याने पालिका निवडणुकीत आपले काही खरे नाही, अशी काँग्रेसजनांची मानसिकता झाली होती; परंतु शिवसेना-भाजप युतीतील वाद, एमआयएम या पक्षातील अंतर्गत लाथाळ्या यामुळे काँग्रेसचे फावले असून एमआयएमच्या मार्गावर असलेल्या अनेकांनी पुन्हा काँग्रेस जवळ करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे काँग्रेसला पालिका सभागृहात पहिल्यापेक्षा जास्त जागा मिळू शकतात, असा विश्वास कार्यकर्त्यांना वाटू लागला आहे.

त्यातच प्रदेशाध्यक्षपदी मराठवाड्याचे सुपुत्र अशोकराव चव्हाण विराजमान झाले. त्यांनी यापूर्वीच्या निवडणुकीतही येथे लक्ष घातले होते. त्यांच्या पक्षस्तरावरील आगमनामुळे कार्यकर्त्यांमध्ये आणखी उत्साह संचारला आहे. त्यामुळेच पार्लमेंटरी बोर्डाच्या बैठकीत पालिकेत ६० पेक्षा जास्त जागा जिंकण्याचे लक्ष्य त्यांनी समोर ठेवले आहे. राष्ट्रवादी काँग्रेससोबत आघाडी केल्यास युतीला फटका बसू शकतो, याची कल्पना असल्यामुळे तशी चर्चा सुरू आहे. राष्ट्रवादीने ४० जागा मागितल्या असून तेवढ्या जागा जर दिल्या तर काँग्रेसला ७३ जागा शिल्लक राहतात. तेवढ्या जागा लढल्या तरी काँग्रेसला ६० जागांपर्यंत पोहोचणे शक्य होईल, असा विश्वास काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांना वाटतो. सोमवारी दुपारपर्यंत आघाडीचे चित्र स्पष्ट होणार असून काँग्रेसने ७० टक्के उमेदवार नक्की केले आहेत. राष्ट्रवादीसोबत चर्चा सुरू झाल्याने त्यांनी यादी जाहीर करण्याचे थांबवले असल्याचे झांबड यांनी स्पष्ट केले.

सर्व काँग्रेसजनांना एकत्र आणण्याचा प्रयत्न
काँग्रेस पक्षात पदाधिकारी तेवढे गट असे चित्र नेहमीच असते. सध्याही फारसे वेगळे चित्र नाही. मात्र, गेल्या दोन दशकांपासून सत्तेत असलेल्या शिवसेना-भाजप युतीला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी पक्षातील सर्व नेते, पदाधिकारी तसेच गट-तट प्रमुखांना एकत्र आणण्याचे प्रयत्न शहराध्यक्ष अॅड. सय्यद अक्रम यांनी सुरू केले आहेत. येत्या चार दिवसांत जिल्ह्यातील सर्व काँग्रेस पदाधिका-यांना एकाच व्यासपीठावर एकत्र आणले जाणार असून त्यासाठी एक जाहीर कार्यक्रम घेणार असल्याचे अक्रम यांनी सांगितले. जिल्ह्यातील आमदार अब्दुल सत्तार व सुभाष झांबड, माजी आमदार डॉ. कल्याण काळे, जिल्हाध्यक्ष केशवराव औताडे, कदीर मौलाना, चंद्रभान पारखे, अरुण व प्रकाश मुगदिया या मंडळींच्या उपस्थितीत सर्व पदाधिकारी गट, तट विसरून एका व्यासपीठावर येणार असून तेथे पालिका निवडणूक जिंकण्यासाठी काय करायचे हे ठरवले जाईल, असे अक्रम यांनी स्पष्ट केले.
पुढे वाचा... अशोकरावांच्या सभेने प्रचाराचा श्रीगणेशा