आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिक्षक म्हणाले, तुमच्यामुळेच आम्ही रस्त्यावर !

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - ‘गरजसरो वैद्य मरो” मराठीतील या म्हणीची प्रचिती मंगळवारी काँग्रेसच्या मोर्चात आली. गांधी पुतळ्यापासून निघालेला मोर्चा आमखास मैदानावर दुपारी अडीच वाजता पोहाेचला. काँग्रेसचे शिष्टमंडळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटण्यासाठी गेले ते परत आंदोलनस्थळी फिरकलेच नाही. त्यामुळे उन्हात ताटकळलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांचा हिरमोड झाला. ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांनी आपापली वाहने शोधली अन् गावाकडे परतले. दरम्यान, शिक्षकांच्या मोर्चाजवळ काँग्रेस नेते आले, त्या वेळी शिक्षकांचा उद्रेक झाला ‘तुमच्यामुळेच आम्ही रस्त्यावर आलो’ असे त्यांनी उद्विग्नतेतून म्हटले.
मोर्चासाठी जिल्हाभरातून काँग्रेस कार्यकर्त्यांनी शेतकरी-शेतमजूर, अपंग, वृद्धांना वाहनाने आणले होते. जिल्हाध्यक्ष अब्दुल सत्तार यांनी मोर्चाचे चांगले नियोजन केले. मोर्चामध्ये त्यांचे चिरंजीव जि.प. उपाध्यक्ष अध्यक्ष समीर अब्दुल सत्तार, जि.प. अध्यक्ष श्रीराम महाजन यांचीच छाप दिसत होती. गांधी पुतळा ते बुढीलेन परिसरात मोर्चा आल्यानंतर तिथे मोर्च्यामध्ये उभी फूट पडली. जामा मशिदीजवळ आधीच पोहाेचलेल्या शिक्षकांच्या मोर्चामुळे काँग्रेसच्या मोर्चेकऱ्यांना आमखास मैदानाकडे जाण्यासाठी जागाच मिळाली नाही. त्यामुळे अर्धे मोर्चेकरी आमखास मैदानावर तर अर्धे बुढीलेन परिसरातच अडकले. मंत्र्यांनी येथे येऊन निवेदन स्वीकारण्याचा आग्रह धरला. पण एसीपी खुशालचंद बाहेती यांनी त्यांची समजूत काढून पोलिस वाहनातून सुभेदारी विश्रामगृहाकडे पाठवले. तिथे मुख्यमंत्री नसल्यामुळे शिष्टमंडळाने निवेदन देण्यास नकार दिला. मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीला निवेदन देण्याचाही प्रयत्न करण्यात आला. पुन्हा पोलिसांनी मध्यस्थी करून शिष्टमंडळाला हॉटेल रामामध्ये बोलावून घेतले.

काँग्रेसचे आमदार अब्दुल सत्तार, सुभाष झांबड, नामदेव पवार, डॉ. कल्याण काळे यांच्यासह नेते मंडळी मोर्चाच्या अग्रभागी होते. काँग्रेसचा मोर्चा जवळ येताच शिक्षकांनी काँग्रेसविरोधात घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली. काहींनी शेरेबाजी केली, ‘तुम्ही पंधरा वर्षे सत्तेत होते. तुमच्यामुळेच आम्ही रस्त्यावर आलो आहोत. आता तुम्हालाही रस्त्यावर यावे लागले’ अशी शेरेबाजी झाल्यामुळे काँग्रेसनेते अक्षरश: चपापले. त्यांना काहीच सुचेनासे झाले. काँग्रेसने चुप्पी साधली.
बातम्या आणखी आहेत...