आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘अच्छे दिन घोषणे’च्या विरोधात काँग्रेसचा मोर्चा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - संपूर्ण कर्जमाफीसह विविध १८ मागण्यांसाठी काँग्रेसने मंगळवारी (४ ऑक्टोबर) मंत्रिमंडळ बैठकीवर मोर्चा काढला. शहागंज येथील गांधी पुतळ्यापासून दुपारी एक वाजता मोर्चाला सुरुवात झाली. जामा मशीद येथे अडीच वाजता मोर्चाचे विसर्जन झाले. त्यानंतर दुपारी २.४५ वाजता निवेदन देण्यात आले.
‘कहाँ गये भाई कहाँ गये...अच्छे दिन कहाँ गये’ अशा घोषणांनी मोर्चा सिटी चौकाकडे झेपावला आणि अवघ्या दोन मिनिटांतच पोलिसांनी अनंत कान्हेरे चौकात अडवला. क्रांती चौकातून निघालेला विनाअनुदानित शिक्षक कृती समितीचा भव्य मोर्चा सिटी चौकातून आमखास मैदानाकडे जात होता. मोर्चे ऐकमेकांमध्ये मिसळू नये, म्हणून पोलिसांनी खबरदारी घेतली. पोलिसांनी काँग्रेसच्या मोर्चाला अर्धा तास थोपवून ठेवले होते. पोलिसांनी दिलेल्या सक्तीच्या विश्रांतीनंतर दीड वाजता पुन्हा मोर्चा बुढीलेनच्या दिशेने निघाला. लाऊड स्पीकर लावलेल्या रिक्षा, अपंगांच्या तीन चाकी सायकल, गोसावी, गोंधळी आणि स्मशानजोगींनी पारंपरिक वेशभूषा परिधान करत मोर्चामध्ये सहभाग नोंदवला. या वेळी महिलांची संख्याही लक्षणीय होती. विशेषत: ग्रामीण भागातील शेतकरी-शेतमजुरांची संख्या मोर्चाचे आकर्षण होते. सिल्लोडचे आमदार तथा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अब्दुल सत्तार, विधान परिषद सदस्य सुभाष झांबड, जि.प. अध्यक्ष श्रीराम महाजन, एम. एम. शेख, शहर-जिल्हाध्यक्ष नामदेव पवार, माजी आमदार डॉ. कल्याण काळे, मिलिंद पाटील, नितीन पाटील, अरूण मुगदिया, माजी शहराध्यक्ष अॅड. सय्यद अक्रम, माजी विरोधीपक्ष नेते डॉ. जफर खान, राजकुमार जाधव, डॉ. जितेंद्र देहाडे, नगरसेवक भाऊसाहेब जगताप, बबन डिडोरे, शेख जमील आदींसह प्रत्येक तालुक्यांतून कार्यकर्ते मोर्चात सहभागी झाले होते.

कर्ज,वीज बिल माफीची मागणी
धडक मोर्चाचे जामा मशीद येथे विसर्जन झाल्यानंतर अडीच वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना १८ मागण्यांचे निवेदन देण्यात आले. संपूर्ण कर्जमाफी वीज बिल माफी देण्यात यावी, शहर-जिल्ह्यात खड्ड्यांसाठी निधी देऊन रस्तेविकास करा, डीएमआयसीमध्ये नवीन उद्योगांना चालना देण्यासाठी विशेष निधी द्यावा, ओला दुष्काळ जाहीर करून निधी द्या, समन्यायी पाणी वाटप करा, मनपामध्ये नव्याने समाविष्ट २० गावांना पायाभूत सुविधा द्या, निराधारांचे मानधन वाढवा, वृद्ध शेतकऱ्यांना अर्थसाहाय्य करा, फळ-भाजी उत्पादकांना नुकसान भरपाई देण्यात यावी, नितीन गडकरी यांनी भूमीपूजन केलेल्या रस्त्यांची कामे पूर्ण करा आदी मागण्यांचा निवेदनात समावेश आहे.

कोंडी : शिक्षकांचा माेर्चा आमखास मैदानावर थोपवण्यात आला, या वेळी जामा मशिदीजवळ अशी वाहतुकीची काेंडी झाली होती.
जनमानसाचा आदर : महिला बालकल्याण विकास मंत्री पंकजा मुंडे यांच्याकडे शिष्टमंडळांचा ओघ सुरू होता.
अंत्ययात्रा : सरकारच्या विरोधात शिक्षक संघटनेने सरकारची ‘राम बोलो भाई राम’ म्हणत प्रतीकात्मक अंत्ययात्रा काढली.
डाव्यांचा आक्रोश : कामगारांच्या विविध मागण्यांसाठी आयटकच्या वतीने काढलेल्या मोर्चात बोलताना डाॅ. राम बाहेती.
महिलांचा आवाज : शिक्षिकांनी माेर्चा काढला तेव्हा पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. या वेळी अनेकांनी छत्र्यांचा आधार घेतला.
नजर : मंत्रिमंडळ बैठकीनिमित्त विविध पक्षांच्या आंदोलकांवर पोलिस आयुक्त अिमतेशकुमार यांनी स्वत: नजर ठेवली होती.

बातम्या आणखी आहेत...