आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सरकारविरोधात काँग्रेसचे ६ जानेवारीला आंदोलन, आमदार डी. पी. सावंत यांची माहिती

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नांदेड - नोटाबंदीच्या ५२ दिवसांनंतरही एटीएमसमोर रांगा असून सर्वसामान्य नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे सहा जानेवारी रोजी सरकारविरोधात काँग्रेस अधिकाऱ्यांना जाब विचारण्यासाठी घेराव मोर्चाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती आमदार डी. पी. सावंत यांनी आज येथे पत्रकार परिषदेत दिली.
  
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आठ नोव्हेंबर रोजी पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर बँकांत व एटीएमसमोर रांगा आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे केवळ घोषणा देऊन सर्वसामान्यांची फसवणूक करत आहेत. यामुळे १८० नागरिकांचा रांगेत उभे असताना मृत्यू झाला, याला जबाबदार कोण, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
  
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ३१ डिसेंबरच्या भाषणातूनही घोर निराशा केली आहे. गरोदर महिलांसाठी सहा हजार रुपये देण्याचा निर्णय हा काँग्रेस सरकारच्या काळातीलच आहे. परंतु भाजप सरकारने उघडपणे सर्वसामान्य नागरिकांच्या डोळ्यात धूळ फेकत सहा हजार रुपयांची घोषणा केली आहे. सरकारकडून परिस्थिती सुधारेल, अशी आशा लावणारी भाषणे देण्यात येत आहेत. लवकरच परिस्थिती सुधारेल, परंतु परिस्थिती केव्हा सुधारेल, असा प्रश्न आमदार सावंत यांनी उपस्थित केला.  निवडणुकीच्या काळात दोन लाख बेरोजगारांना नोकऱ्या देऊ, असे आमिष दाखवून मते मिळवली; परंतु आजपर्यंत वीस हजारांपेक्षाही जास्त लोकांना नोकऱ्या देऊ  शकले नाहीत. त्यामुळे रोजगार कमी होत आहे. सर्वसामान्य जनतेला होणाऱ्या व आजपर्यंत झालेल्या त्रासाबद्दल सरकारने जनतेची माफी मागावी, असेही ते म्हणाले. 

लातुरातही आंदोलन
लोकांना होत असलेल्या त्रासाच्या निषेधार्थ काँग्रेस पक्ष शुक्रवार आणि रविवार असे दोन दिवस आंदोलन करणार असल्याची माहिती काँग्रेस पक्षाचे निरीक्षक बसवराज ए. पी. यांनी दिली. लातूर येथे होणाऱ्या आंदोलनाची माहिती देण्यासाठी ते सोमवारी कर्नाटकातील हसन येथून लातूरला आले होते. या वेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व्यंकट बेद्रे, माजी खासदार तुकाराम रेंगे, टी. पी. मुंडे, माजी आमदार  वैजनाथ शिंदे, धीरज देशमुख यांची उपस्थिती होती. आंदोलनाचे स्वरूप अजून ठरलेले नसून ते ऐनवेळी उघड करणार असल्याचे ते म्हणाले.
 
 
बातम्या आणखी आहेत...