आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Congress, Nationalist Congress Corporators Will Join BJP

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

काँग्रेस, राष्ट्रवादीच्या नगरसेवकांना लागले भाजपचेच वेध

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - महानगरपालिकेच्या सभागृहातील दोन माजी विरोधी पक्षनेत्यांसह काँग्रेस व राष्ट्रवादीचे मिळून ६ नगरसेवक भाजपच्या तंबूत जाणार असल्याचे नक्की झाले आहे. गत आठवड्यात या नगरसेवकांचा प्रवेश सोहळा होणार होता; परंतु काहींनी आरक्षणाची सोडत होऊ द्या, अशी विनंती केल्याने हा निर्णय लांबणीवर पडला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सोमवारनंतर या नगरसेवकांना अधिकृतपणे भाजपमध्ये प्रवेश दिला जाऊ शकतो.

भाजपमध्ये जाण्यास इच्छुक असणा-यांमध्ये शिवसेनेतून काँग्रेसवासी झालेले दामोदर शिंदे हे आता भाजपमध्ये असणार हे आधीच जाहीर करण्यात आले. दोन माजी विरोधी पक्षनेत्यांमधील एक जण पैठण रस्त्यावरील, तर दुसरे उच्च न्यायालय परिसरातील वॉर्डातून विजयी झाले आहेत. या सहा जणांमध्ये सिडकोतील एका काँग्रेस नगरसेविकेचाही समावेश आहे. त्या गतवेळी पहिल्यांदाच निवडून आल्या आहेत.चिकलठाणा परिसरातील मूळ भाजपचे नगरसेवक एका टर्मनंतर पुन्हा भाजपमध्ये दाखल होणार आहेत. शहर प्रगती आघाडीकडून पराभूत झाल्यानंतर टीव्ही सेंटर परिसरातील एक माजी नगरसेवकही भाजपच्याच मार्गावर आहेत. त्यांनी महानगरप्रमुख प्रदीप जैस्वाल यांचा शिवसेनेत येण्याचा आग्रह मोडल्याचे समोर येते.

दोन वेळा अपक्ष अन् एकदाच राष्ट्रवादीकडून निवडून आलेले पालिकेतील माजी पदाधिकारीही भाजपच्या वाटेवर असल्याचे समजते. मात्र, त्यांनी वॉर्ड आरक्षण झाल्यानंतर निर्णय घेतला जाईल, असे स्पष्ट केले आहे. मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ब-याच राजकीय हालचाली होण्याची चिन्हे आहेत.

शहराध्यक्षांना माहिती नाही
पक्षात कोण नगरसेवक किंवा अन् पक्षाचे पदाधिकारी येताहेत, याची भाजप शहराध्यक्ष भगवान घडामोडे यांना माहिती नाही. विधानसभा निवडणुकीच्या वेळी पश्चिममधून उमेदवारी देण्यासाठी एक माजी पदाधिकारी प्रदेश नेत्यांना भेटून आला. ऐनवेळी मधुकर सावंत यांना उमेदवारी देण्यात आली. मध्यमधून किशनचंद तनवाणी हे उमेदवार ठरले, याचीही माहिती घडामोडे यांना नव्हती. मंगळवारी छावणी परिषदेचे अपक्ष सदस्य संजय गारोल हे भाजपमध्ये दाखल झाले, याचीही माहिती त्यांना नव्हती. त्याचबरोबर २ माजी विरोधी पक्षनेत्यांसह ६ नगरसेवक पक्षात येत असल्याचीही माहिती घडामोडे यांना नाही.

मनसैनिकही रांगेत
सूत्रांच्या माहितीनुसार काही मनसैनिकही भाजपच्या प्रवेश रांगेत असल्याचे समजते. गतवेळी मनपा निवडणुकीत पराभूत झालेले तसेच विजयी झालेलेही भाजपच्या तंबूत येण्यास इच्छुक असल्याचे समजते. तसे झाल्यास भाजपच्या रांगेत असलेल्या सदस्यांची संख्या ७ होईल.

विद्यमान कार्यकर्त्यांची नाराजी
भाजपच्या कार्यकर्त्यांना राष्ट्रवादी तसेच काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची पक्षातील आयात मान्य नाही. मोदी फॅक्टरवर विजय मिळवता येत असेल तर आम्ही काय चूक केली, असा त्यांचा सवाल आहे.