छायाचित्र: तिकीट न मिळाल्याने गजानन बारवाल यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला.
उमेदवारी अर्ज भरण्यासाठी फक्त चारच तास असताना सोमवारी सायंकाळी शिवसेना व भाजपची युती जाहीर झाली. यात अनेकांचे वाॅर्ड दुस-या पक्षाला गेले तर काहींचे पत्ते कापण्यात आल्याने युतीतील सुमारे २० जणांनी बंडांचा झेंडा खांद्यावर घेण्याचे संकेत दिले. दुसरीकडे उमेदवार मिळत नसल्याने तगडे उमेदवार आयते मिळतील या आशेने काँग्रेस तसेच राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांनी अशा युतीतील नाराजांचा रात्री उशिरापर्यंत शोध घेतला. आघाडीचे नेते बी फॉर्मची फाइल हाती घेऊन नाराजांच्या घरी गेले होते. परंतु अपक्षच लढणार, घड्याळही नको अन् पंजाही नको म्हणत या अपक्षांनी नकार दिल्याचे समोर आले.
पंजा किंवा घड्याळ चिन्ह घेतल्यास हक्काची मते जातील अशी भीती त्यांनी व्यक्त केली. युती जाहीर होताच गुलमंडी, औरंगपुरा, समर्थनगर, ज्योतीनगर, विद्यानगर, उल्कानगरी, क्रांती चौक, पुंडलिकनगर, पदमपुरा, बन्सीलालनगर, नागेश्वरवाडी, मिटमिटा, कामगार कॉलनी, सिडको एन-२ या वाॅर्डांत बंडखोरी होणार हे जवळपास स्पष्ट झाले. इकडे काँग्रेस तसेच राष्ट्रवादीच्या वतीने अनेकांना बी फॉर्म देण्यात आले असले तरीही युतीतील तगडे उमेदवार आयते मिळतील या आशेने त्यांनी नाराजांचा शोध घेण्यास सुरुवात केली. थेट उमेदवारीची ऑफर देण्यात येत होती. विशेष म्हणजे कोरे बी फॉर्म सोबत घेऊन ही नेते मंडळी युतीतील नाराजांच्या घरापर्यंत पोहाेचली. पहाटे तीन वाजेपर्यंत हा प्रकार सुरू होता. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, युतीतील खासकरून शिवसेनेतील नाराजांनी काँग्रेस व राष्ट्रवादीची उमेदवारी नाकारली. लढलो तर अपक्षच लढणार असे त्यांनी स्पष्ट केले. काँग्रेसचा पंजा किंवा राष्ट्रवादीचे घड्याळ हे चिन्ह घेतले तर हक्काची मते मिळणार नाही. सहानुभूती केवळ अपक्ष म्हणून लढलो तरच मिळेल, असा युक्तिवाद क्रांती चौक परिसरातील एका उमेदवाराने केला. इच्छुक खूप असल्याचे सांगत काँग्रेस व राष्ट्रवादीने आघाडी केली नसली तरी प्रत्यक्षात त्यांना अनेक वाॅर्डांत सक्षम उमेदवार मिळत नव्हते. त्यामुळे युती झाल्यानंतर बंडखोरीची भाषा करणा-यांचा शोध दोन्हीही पक्षाच्या स्थानिक पदाधिका-यांना केला. विशेष म्हणजे काँग्रेस व राष्ट्रवादी या दोन्हीही पक्षांना गुलमंडीवर उमेदवार भेटत नव्हता. तेथून दोन्हीही पक्षांनी तेथील संभाव्य बंडखोरांना बी फॉर्म देऊ केला होता. मात्र तेथून या दोन्हीही पक्षांकडून लढण्यास बंडखोर राजी नव्हते. गुलमंडीबरोबरच विद्यानगर, उल्कानगरी, शिवाजीनगर, मिटमिटा, समर्थनगर, औरंगपुरा, नागेश्वरवाडी येथील सेना-भाजपच्या नियोजित बंडखोरांशी काँग्रेस तसेच राष्ट्रवादीच्या वतीने पहाटेपर्यंत संपर्क साधण्यात येत होता. मात्र तरीही त्यांच्या हाती कोणी लागले नाही.
गुलमंडीतही दिली होती ऑफर
शिवसेनेकडून उमेदवारी मिळणार नाही, असे तिघांना वाटते. त्या तिघांनाही काँग्रेसकडून ऑफर देण्यात आली होती. एकाने नकार दिला तर तुम्ही आमच्या चिन्हावर लढणार नसाल तर किमान आम्हाला एखादा चांगला उमेदवार तरी द्या, अशी विनंती करण्यात येत होती. त्यामुळे काँग्रेसचा गुलमंडीवरील उमेदवार मंगळवारी दुपारी १२ वाजेपर्यंत निश्चित झाला नव्हता.