आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काँग्रेस राष्ट्रवादीचे आजी-माजी आमदार एमआयएमच्या संपर्कात- आमदार इम्तियाज जलील

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - काँग्रेस राष्ट्रवादीचे आजी-माजी आमदार एमआयएमच्या संपर्कात असल्याचे वृत्त वेळोवेळी कानी येते. परंतु नगरसेवक तर सोडाच पण या दोन्ही पक्षाचे काही नेतेही आमच्या संपर्कात असल्याचा दावा आमदार इम्तियाज जलील यांनी पत्रकारांशी बोलताना केला.
प्रवेशासाठी गुडघ्याला बाशिंग बांधलेले ते नेते कोण हे अर्थातच त्यांनी सांगितले नाही. पण आम्हाला परंपरागत बरबटलेले राजकारण करायचे नाही. चांगल्या मुलांना सेवेची संधी द्यायची आहे, असे सांगत बाहेरून आलेल्यांना उमेदवारी दिली जाणार नाही आणि केवळ उमेदवारीसाठीही कोणाला पक्षात प्रवेशही दिला जाणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
राजकीय पाठबळ नसले तरी हुशार, धोरणी तरुणांना निवडणुकीत संधी दिली जाईल. आम्हाला परंपरागत राजकारण करायचे नाही. राजकारणातून शहराचा विकास होतो. त्यासाठीच आम्ही तसेच तरुण मैदानात उतरवू, असे त्यांनी स्पष्ट केले. माझी राजकीय पार्श्वभूमी नसताना पक्षाने मला संधी दिली. यापुढेही असेच होईल. त्यामुळे केवळ निवडणूक लढवण्यासाठी कोणी आमच्या पक्षात येत असेल तर त्याला कशी उमेदवारी दिली जाईल, असा प्रतिप्रश्न त्यांनी केला. महापालिका निवडणुकीसाठी आमची रचना अतिशय पारदर्शक असणार आहे हे त्यांनी आवर्जून सांगितले.

काँग्रेस राष्ट्रवादीच्या नेत्यांना मी खुले आव्हान देतो. त्यांनी आम्हाला थांबवून दाखवावे, अशा शब्दात इम्तियाज यांनी शड्डू ठोकले. ते म्हणाले, आता घोडा-मैदान समोर आहे. पण आघाडीच्या नेत्यांनी आपली इज्जत वाचवण्यासाठी फक्त राज्य पातळीवरीलच नव्हे तर थेट दिल्लीतून नेते आणून येथे बसवावे, तरच त्यांची थोडीफार काही शिल्लक राहील. आम्ही किती जागा जिंकू हे काळच दाखवून देईल, असेही ते म्हणाले.