आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काँग्रेस, राष्ट्रवादीच्या नेत्यांचा दोन्ही डगरींवर पाय, पोटनिवडणुकीसाठीही तयार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- सातारा-देवळाईचा मनपात समावेश व्हावा, अशी ठाम भूमिका शिवसेना,भाजप नेत्यांनी घेतल्यानंतर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही तसाच सूर असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे; परंतु स्थानिक कार्यकर्त्यांची मागणी विचारात घेऊन आंदोलनासाठी पाठिंबा देण्याचा विचार करणार आहेत, असेही दोन्ही पक्षांच्या नेत्यांचे म्हणणे आहे. तसेच मनपा पोटनिवडणूक झालीच तर तशीही तयारी आहे, असा दावाही केला जात आहे.
सातारा-देवळाईचा वाद विकासासाठी नव्हे तर जमिनीसाठी सुरू असलेले राजकारण आहे, अशी भावना व्यक्त करत राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष काशीनाथ कोकाटे यांनी अप्रत्यक्षपणे शिवसेनेवर टीका केली आहे. न्यायालयाच्या निकालानंतर नगर परिषदेची अधिसूचना रद्द करण्यासंदर्भात प्रक्रिया सुरू होताच नगर परिषद समर्थकांच्या जीवात जीव आला; परंतु पक्षाचे धोरण मनपा समावेशाचे असल्यामुळे भाजप, शिवसेना कार्यकर्त्यांची कोंडी झाली. मात्र, प्रसंगी पक्षातील ज्येष्ठांचा विरोध झुगारून नगर परिषदेसाठी प्रयत्न करण्याचा निर्णय घेत कार्यकर्त्यांनी लोकमानस जागृत करण्यास सुरुवातही केली.
एकीकडे या हालचाली सुरू असताना आपण काय करायचे, काय भूमिका घ्यायची याबाबत काँग्रेस, राष्ट्रवादीतील स्थानिक कार्यकर्ते संभ्रमात होते. यासंदर्भात कार्यकर्त्यांत कुजबूज सुरू असताना काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहरातील पदाधिकाऱ्यांनीही वरिष्ठांचा कौल घेतला होता. त्यांच्याकडून मनपा समावेशास झुकते माप मिळाल्याने त्यांनी कार्यकर्त्यांच्या मनात काय चालले आहे, याचाही आढावा घेतला.

या पार्श्वभूमीवर काँग्रेस आणि राष्ट्रवादीतील पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला असता कार्यकर्त्यांच्या मागण्या वरिष्ठांना कळवल्या जातील. मात्र, परिसराच्या विकासाचा सर्वात आधी विचार केला जाईल, असे काँग्रेसचे शहराध्यक्ष सय्यद अक्रम यांनी सांगितले. तसेच काँग्रेसला तेथे चांगले नेतृत्व असून मनपा पोटनिवडणुकीत स्वतंत्र लढणार असल्याचे संकेतही त्यांनी दिले, तर कार्यकर्त्यांना कायम पाठिंबा असल्याचे सांगत आधी त्यांना पुढे येऊ द्या, नागरिकांचा कौल घेऊन पक्षाचा अंतिम निर्णय घेतला जाईल, अशी प्रतिक्रिया कोकाटे यांनी दिली.

कार्यकर्त्यांचा विचारही घेणार
सातारा-देवळाईसाठीमनपाच योग्य आहे. नगर परिषदेला विकासासाठी पुरेसा निधी येत नाही. मनपात समावेश झाल्यास ही अडचण दूर होईल. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाणही मनपा समावेशासाठी अनुकूल आहेत. परंतु स्थानिक कार्यकर्त्यांचे मतही विचारात घेतले जाईल. सय्यदअक्रम, शहराध्यक्ष, काँग्रेस

स्वार्थासाठी राजकारण
सत्ताधाऱ्यांनायापूर्वी महानगरपालिका क्षेत्रात समाविष्ट झालेल्या भागांचा विकास करता आला नाही. सातारा-देवळाईची लोकसंख्या जास्त आहे. सध्या तरी या प्रश्नाचे राजकारण सुरू आहे. मात्र, आम्हीही कार्यकर्त्यांच्या भावना समजून घेऊनच निर्णय घेऊ. काशीनाथकोकाटे, शहराध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस