आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काँग्रेस-राष्ट्रवादीची फुलंब्रीत स्वतंत्र चूल

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

फुलंब्री - जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका 7 फेब्रुवारी रोजी होणार असून यासाठी उमेदवारी अर्ज भरण्यास 18 जानेवारीपासून प्रारंभ होत आहे. फुलंब्री तालुक्यात फुलंब्री वडोदबाजार, बाबरा, गणोरी हे 4 गट आहेत, तर फुलंब्री, पाल, बाबरा, आळंद, वडोदबाजार, पीरबावडा, गणोरी, वानेगाव हे 8 गण आहेत. फुलंब्री तालुक्यात एकूण 1 लाख 10 हजार 434 मतदार आहेत. गेल्या आठवड्यात कॉँग्रेस, राष्ट्रवादीची आघाडी होईल, अशी शक्यता होती; परंतु अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नसल्याने दोन्ही पक्षांनी स्वतंत्रपणे निवडणूक लढविण्याची घोषणा केली आहे.
शिवसेना व भारतीय जनता पार्टी यांची युती होत असल्याचे संकेत मिळत आहेत. गणोरी गट शिवसेनेसाठी सोडावा, अशी मागणी होत आहे. त्यामुळे अखेरच्या क्षणी काय निर्णय होईल, याकडे राजकीय कार्यकर्त्यांचे लक्ष लागून आहे. मागच्या वेळी शिवसेनेकडे फुलंब्री व वडोदबाजार या दोन जागा होत्या; मात्र विष्णू भवंडर यांचे जातीचे प्रमाणपत्र अवैध असल्याने वडोदबाजार गटात पुन्हा पोटनिवडणूक होऊन या ठिकाणी कॉँग्रेसचे शिवराम म्हस्के हे निवडून आले होते. तालुक्यात जितेंद्र जैस्वाल(बाबरा), राजेंद्र ठोंबरे ( फुलंब्री),लताबाई मगरे(गणोरी) व शिवराम म्हस्के असे पक्षीय बलाबल होते. तर पंचायत समितीत कॉँग्रेस 4,शिवसेना 3,भाजप 1 असे पक्षीय बलाबल होते.
सुरुवातीचे अडीच वर्ष अनुसूचित जातीसाठी सभापतीपद राखीव असल्यामुळे गणधीश शेजवळ हे अडीच वर्षे सभापतीपदी होते; परंतु विधानसभा निवडणुकीत शिवसेनेने आमदार डॉ.कल्याण काळे यांना मदत केल्यामुळे तालुक्यात विकासकामासाठी शिवसेनेला सव्वा वर्षे सभापतिपद व उपसभापतिपद दिले. या वेळी शिवसेना भाजपची युती झाली, तर कॉंग्रेस, राष्ट्रवादीत आघाडी न होता ते परस्परांविरुद्ध लढणार आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेना तटस्थ दिसते. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आतापर्यंत बैठका,मेळावे असे कोणतेही राजकीय कार्यक्रम घेतलेले नाही. वडोदबाजार गट हा मनसेचे जिल्हाध्यक्ष भास्कर गाडेकर यांचा असल्यामुळे ते या गटात निर्णायक भूमिका घेऊ शकतात.