आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Congress Of The Determination And Melavyata Issue At Aurangabad

काँग्रेसच्या निर्धार मेळाव्यात नेत्यांच्या चेहर्‍यावर चिंता, मात्र चिंतनाचा अभाव

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - विलासराव देशमुख यांच्या जयंतीनिमित्त आयोजित काँग्रेसच्या निर्धार मेळाव्यात निर्धार कमी, परंतु खुशमस्करी करणे व कोपरखळ्या मारण्यातच व्यासपीठावरील नेतेमंडळींनी वेळ घालवला. राज्याचे शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांनी एक शेर सादर करत काढता पाय घेतला. मेळाव्यात नेत्यांमध्ये चिंता होती, परंतु त्यावर चिंतनाचा अभाव दिसला. पालकमंत्री बाळासाहेब थोरात यांनी खचून न जाता विधानसभा निवडणुका लक्ष्य समजून काम करण्याचा संदेश कार्यकर्त्यांना दिला.

सिडकोतील संत तुकोबाराय नाट्यगृहात सोमवारी पार पडलेल्या काँग्रेस मेळाव्यास पालकमंत्री बाळासाहेब थोरात, शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा, आमदार अब्दुल सत्तार, आमदार कल्याण काळे, आमदार एम. एम. शेख, जिल्हाध्यक्ष केशवराव औताडे, शहराध्यक्ष अँड. सय्यद अक्रम, माजी खासदार उत्तमसिंह पवार, जि. प. अध्यक्षा शारदा जारवाल, प्रकाश मुगदिया, विलास औताडे, जितेंद्र देहाडे, माजी. आमदार नामदेव पवार, जे. के. जाधव, माजी मंत्री अशोक डोणगावकर, अनिल पटेल, राष्ट्रवादीचे माजी जिल्हाध्यक्ष मनमोहनसिंग ओबेरॉय, चंद्रभान पारखे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

पालकमंत्र्यांची केली खुशमस्करी : चंद्रभान पारखे यांनी विलासराव देशमुख हे माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पा. निलंगेकर, शिवराज पाटील व शंकरराव चव्हाण यांच्या तुलनेत कमी जातीयवादी असल्याने आपण त्यांच्या जवळ गेल्याचे सांगितले. पालकमंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे संपूर्ण महाराष्ट्र विलासरावांचे वारसदार म्हणून पाहत असल्याचे सांगत त्यांनी काँग्रेस व मराठवाड्याला गतवैभव मिळवून द्यावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.

स्वकीय व विरोधकांना चिंतनाची गरज : शालेय शिक्षणमंत्री दर्डा यांनी ‘एक हार से कोई फकीर नहीं बनता और एक जीत से कोई सिकंदर नहीं बनता’ हा शेर सांगत स्वकीयांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला. विरोधक (खासदार खैरे यांचा नामोल्लेख टाळत) केवळ 25 ते 30 हजार मतांनी विजयी होऊ, असे सांगत होते. परंतु प्रत्यक्षात ते जास्त मतांनी निवडून आले. त्यामुळे केवळ चिंतन काँग्रेससाठी आवश्यक नसून विरोधकांना विचार करण्यास भाग पाडणारे असल्याचे दर्डा यांनी सांगितले.
श्रम न करताच लोकप्रतिनिधी झाले

समाजात जाणारे कार्यकर्ते निर्माण करा
काँग्रेसने केवळ गेस्ट हाऊस व विमानतळावर जाणारे कार्यकर्ते निर्माण करू नयेत. समाजात जाऊन काम करणारे कार्यकर्ते निर्माण केल्यास पराजयास सामोरे जाण्याची वेळ येणार नसल्याचे माजी मंत्री अनिल पटेल यांनी सांगितले.

कार्यकर्त्यांनी पाच वर्षे काम करावे
काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केवळ निवडणुकीपुरते काम न करता पाचही वर्षे समाजाचे प्रश्न सोडवत राहावे, असा सल्ला पालकमंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिला. आगामी काळात आपल्या वाटचालीचे नियोजन करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. आगामी विधानसभा निवडणुकांवर कार्यकर्त्यांनी आपले लक्ष केंद्रित करण्याचे आवाहन थोरात यांनी केले.