आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Congress Parlement Election Prepatration In Aurangabad

काँग्रेसच्या उमेदवारांनी सुरू केली लोकसभेसाठी चाचपणी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - नऊ महिन्यांवर येऊन ठेपलेल्या लोकसभा निवडणुकीत उमेदवारीसाठी काँग्रेसची अनेक नावे चर्चेत येत आहेत. विधानसभेचा मार्ग मोकळा करण्यासाठी फुलंब्रीचे आमदार डॉ. कल्याण काळे यांना या वेळी लोकसभेची उमेदवारी द्यावी, यासाठी एक गट प्रयत्नशील आहे. दुसरीकडे मागील पराभवाने विचलित न होता उत्तमसिंग पवार पुन्हा कामाला लागले आहेत, तर नवीन चेहरा म्हणून माजी आमदार नितीन पाटील, आमदार एम. एम. शेख, जिल्हाध्यक्ष केशवराव औताडे यांचे चिरंजीव विलास औताडे यांचे नाव चर्चेत आहे.

1999, 2004 आणि 2009 मध्ये सलग तीन वेळा शिवसेनेचे चंद्रकांत खैरे यांनी येथून विजय मिळवत लोकसभा गाठली. शिवसेनेतील अंतर्गत वादामुळे या वेळी खैरे यांना लोकसभा निवडणूक अवघड जाईल, अशी चर्चा काँग्रेसबरोबरच शिवसेनेतही सुरू झाली आहे. विजयाची खात्री वाढू लागल्याने काँग्रेसकडून उमेदवारीसाठीही बरीच नावे पुढे येत आहेत. गतवेळी जालना लोकसभा मतदारसंघातून पराभूत झालेले फुलंब्रीचे आमदार डॉ. काळे यांनी या वेळी औरंगाबादेतून लढावे, असे काहींचे म्हणणे आहे. ‘मराठा स्ट्राँग मॅन’ खैरेंना लीलया पराभूत करू शकतो, असा त्यामागील युक्तिवाद आहे. अनेक वर्षांपासून जिल्हा बँकेवर एकहाती पकड असलेले आणि याच मतदारसंघातून पराभवाचा अनुभव घेतलेले सुरेश पाटील यांची कन्नड मतदारसंघातून आमदार राहिलेला मुलगा नितीन यांच्यासाठी मोर्चेबांधणी सुरू आहे. अल्पसंख्याकांनाही येथून संधी मिळावी म्हणून आमदार एम. एम. शेख यांचेही नाव चर्चेत आहे.

डॉ. काळे यांना लोकसभेची उमेदवारी मिळाली म्हणजे फुलंब्रीतून इच्छुक असणार्‍यांचा मार्ग मोकळा होणार आहे. त्यासाठी डॉ. काळे यांच्या नावाला ‘पूर्वे’कडील मंडळींचा पाठिंबा असल्याचे समजते. तयारीचाच मुद्दा प्रमुख मानला तर काळे यांनी मतदारांचा कौल जाणून घेण्यासाठी सर्वेक्षण सुरू केले आहे. खैरे यांच्याविरोधात कोणत्या उमेदवाराला लोक पसंती देतील आणि पसंती दिली तर प्रत्यक्षात किती मतदान करतील, याचा अंदाज ते सर्वेक्षणातून घेत आहेत. औरंगाबाद शहरातील मतदान लोकसभेसाठी निर्णायक ठरते. त्यामुळे काँग्रेसअंतर्गत विरोधामुळे येथून अधिकाधिक किती मते मिळू शकतात, हिंदुत्ववादी मतांमध्ये फूट पडू शकते का, याचाही अभ्यास डॉ. काळे यांचे सर्वपक्षीय सर्मथक करत आहेत. माजी खासदार पवार यांनीही जोरदार तयारी केली आहे. त्यांनी पक्षबांधणी, कार्यकर्त्यांच्या नेमणुका, त्यांच्यावरील जबाबदार्‍यांमध्ये लक्ष घालण्यावर भर दिला आहे. प्रत्येक बूथमधून किती मते मिळू शकतील, याच्या अभ्यासावर त्यांनी लक्ष केंद्रित केले आहे.

उत्तमसिंग पवार, नितीन पाटील, आमदार एम. एम. शेख आण् िआत्माराम बोर्डे यांची नावे दिल्लीपर्यंत गेली आहेत. त्यातून उमेदवार ठरेल. अल्पसंख्याक, दलितांना प्राधान्य द्यावे, अशी मागणी मी केली आहे. मात्र जोपर्यंत राजेंद्र दर्डा राज्यात मंत्री आहेत तोपर्यंत येथून खासदार विजयी होऊ शकत नाही. त्यांच्यामुळेच महापौर होऊ शकला नाही.’’ - चंद्रभान पारखे, ज्येष्ठ कार्यकर्ते.

गतवेळी पराभव झाल्यानंतर मी पुन्हा कामाला लागलो होतो. माझे बूथवर्क तयार झाले आहे. श्रेष्ठींकडे उमेदवारीसाठी मागणी करणार. राजकारणात निवडणुकीसाठी नेहमी सज्ज राहावे लागते. या वेळी काँग्रेसचा विजय नक्की आहे.’’ उत्तमसिंग पवार, 2009 चे पराभूत उमेदवार.

सध्या कोणत्याही निवडणुकीचा आम्ही विचार करत नाही. दुष्काळावर मात करणे यावरच आम्ही लक्ष केंद्रित केले आहे. दुष्काळावर मात केली म्हणजे निवडणूक आम्हीच जिंकणार आहोत. सध्या आम्ही राजकारणापासून दूर आहोत.’’ - केशवराव औताडे, जिल्हाध्यक्ष, काँग्रेस.