आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काँग्रेसने संकल्प मेळाव्यात संकल्प कमी, गोंधळ जास्त!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - लोकसभा निवडणुकीतील पराभवामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांच्या खचलेल्या मन:स्थितीला उभारी देण्याकरिता शनिवारी शहानूरमियां दर्गा परिसरातील श्रीहरी पॅव्हेलियन येथे काँग्रेसने संकल्प मेळावा घेतला. या मेळाव्यात संकल्प कमी, पण गोंधळच जास्त झाला. मेळाव्याच्या सुरुवातीपासूनच घोषणाबाजी आणि कार्यकर्त्यांचा गोंधळ पाहावयास मिळाला. अखेर गोंधळातच मेळाव्याचे सूप वाजले.

धनगर समाजाला आरक्षण द्या, मराठवाड्याला पाणी द्या, रामकृष्ण जलसिंचन उपसा योजनेची कर्ज माफी द्या, या मागण्यांसाठी मेळाव्याच्या सुरुवातीपासूनच कार्यकर्त्यांच्या घोषणा सुरू होत्या. अनेक घोषणाबाज कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले, तरीदेखील गोंधळ घालणार्‍यांची कमी नव्हती. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, काँग्रेसचे सरचिटणीस मोहन प्रकाश, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, शिवाजीराव पाटील निलंगेकर आदींची उपस्थिती होती.

घोषणाबाजीत मुख्यमंत्र्यांचे स्वागत
सकाळी 11 वाजेपासूनच या संकल्प मेळाव्यासाठी मराठवाड्यातून कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. धनगर समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी कार्यकर्त्यांनी मुख्य प्रवेशद्वाराजवळच ठिय्या मांडून घोषणाबाजी केली. घोषणाबाजीत मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याचे स्वागत झाले, तर सभागृहात माजी खासदार उत्तमसिंग पवारांच्या कार्यकर्त्यांनी घोषणा देतच प्रवेश केला. व्यासपीठाची सूत्रे सांभाळत असलेले दुग्ध विकासमंत्री अब्दुल सत्तार यांनी या कार्यकर्त्यांना चांगलाच दम भरला. काही लोक या मेळाव्यात कंत्राट घेऊन आले आहेत. ते काँग्रेसचे खरे कार्यकर्ते नाहीत. येथे कुठल्याच नेत्याची घोषणाबाजी चालणार नाही, असे सुनावत केवळ उत्तमसिंगांना व्यासपीठावर घ्या, बाकी सगळ्यांना बाहेर काढा, असे फर्मान सोडले. या वेळी पवारांच्या सुमारे 100 कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. यात महिला कार्यकर्त्यांचाही समावेश होता. या अपमानामुळे उत्तमसिंग पवारांनी मेळाव्यातून काढता पाय घेतला. धनगर समाजाच्या आरक्षणाची मागणी करणार्‍या शिष्टमंडळाला वेळ दिला नसल्यामुळे कार्यक्रम संपल्यानंतर त्यांनी मुख्यमंत्र्यांना घेराव घालण्याचा प्रयत्न केला.
या संकल्प मेळाव्याला दीड ते दोन हजार कार्यकर्ते आणि पदाधिकार्‍यांची गर्दी जमली होती.
  • मेळाव्यात महात्मा गांधी, इंदिरा गांधी, शिवाजी महाराज, बसवेश्वर महाराज यांच्यासह विलासराव देशमुख यांचाही फलक होता.
  • नवनियुक्त राज्यमंत्री अमित देशमुख यांचे पहिलेच भाषण होते. त्यांची बोलण्याची आणि वेशभूषेची शैली पाहून अनेकांना विलासरावांची आठवण झाली.
  • लोकसभेत काँग्रेसची इभ्रत राखणार्‍या मराठवाड्यातील दोन खासदार अशोक चव्हाण आणि राजीव सातव यांचे व्यासपीठावरील अस्तित्व वेगळे जाणवत होते. त्यांच्या भाषणातूनही ते दिसून आले.
  • मेळाव्याच्या आयोजनात प्रमुख जबाबदारी असलेले माजी मंत्री बसवराज पाटील मेळाव्याच्या आदल्या दिवशी आजारी पडले. त्यांना सिग्मा हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले होते.
मुख्यमंत्र्यांनी त्यांची भेट घेतली.
  • व्यासपीठावरील प्रत्येक नेत्याचे भाषण मोदी लाटेने सुरू झाले. लोकसभेत आपला दारुण पराभव झाला हे मान्य करत आपल्याला अस्तित्व दाखवून द्यायचे, असा सर्वांनी सूर लावला.
  • मोदी सरकारवर ‘अब की बार महंगी सरकार’ ही अमित देशमुख यांनी भाषणात नवीन घोषणा दिली. तर ‘नमो मोदी नमो मोदी’च्या ऐवजी आता ‘नको मोदी नको मोदी’ अशी घोषणा द्यावी लागेल या डी. पी. सावंतांच्या वाक्याला कार्यकर्त्यांनी भरभरून प्रतिसाद दिला.
पॅव्हेलियनला पोलिसांचा गराडा
पोलिस आयुक्त राजेंद्रसिंह यांच्या समवेत शेकडो पोलिसांचा फौजफाटा बंदोबस्तासाठी होता. कार्यकर्त्यांच्या गोंधळामुळे पोलिसही सतर्क झाले होते. कुठलाही कार्यकर्ता उभा राहिला की त्याची ते विचारपूस करत होते. कार्यक्रम संपल्यानंतर आजारी असलेले माजी मंत्री बसवराज पाटील यांना भेटण्यासाठी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जात असताना मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील पोलिसांची एक गाडी बंद पडली. तिला धक्का देऊन सुरू करावे लागले.