आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Congress Reaction After Aurangabad Corporation Result

विश्लेषण - मतदार जातिवादाला बळी पडल्याने अपयशाचा दावा!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - विधानसभा निवडणुकीत निर्माण झालेली एमआयएम या पक्षाची लाट रोखण्यात काँग्रेस तसेच राष्ट्रवादीला अपयश आले. शहरातील मतदार विकासाऐवजी जाती-पातीवर मतदान करत असल्यामुळे विकासाच्या नावावर राजकारण करणाऱ्या या पक्षांना जनाधार मिळाला नसल्याचा युक्तिवाद या पक्षाच्या स्थानिक नेत्यांकडून करण्यात येत आहे.
दोन्ही पक्षांत आघाडी न झाल्याने काही जागा कमी झाल्याचा युक्तिवाद असला तरी आघाडी झाली असती तरी ते गतवेळचा आकडा गाठू शकले असते की नाही, यावर शंका आहे.
मावळत्या सभागृहात काँग्रेसचे १९ तर राष्ट्रवादीचे ११ सदस्य होते. आघाडी करून गतवेळी हे पक्ष लढले होते. या वेळी त्यांनी आघाडी केली नाही.
स्वतंत्रपणे लढताना काँग्रेसला दहा तर राष्ट्रवादीला फक्त तीनच जागा मिळू शकल्या. गतवेळी येथे एमआयएम नव्हते. तेव्हा हे दोन्ही पक्ष ३० पर्यंत पोहोचले होते. मात्र या वेळी दोन्ही पक्ष मिळून १३ पर्यंत पोहोचू शकले. आम्ही पुरस्कृ़त केलेले तीन नगरसेवक निवडून आल्याने काँग्रेसचाच आकडा १३ असल्याचा दावा आमदार सुभाष झांबड यांनी केला आहे.
महापौरांना आम्हीच पाडले

राष्ट्रवादीला अवघ्या तीनच जागा मिळाल्या असल्या तरी मावळत्या महापौर कला ओझा यांना त्यांच्या उमेदवार संगीता मोरे यांनी ६०० पेक्षा अधिक मतांनी पराभवाची धूळ चारली. त्यामुळे संगीता मोरे या चर्चेत आल्या. गेल्या पाच वर्षांतील दोन्हीही महापौर पराभूत होतात, यावरून येथील कारभाराला लोक कंटाळले आहेत. मात्र अन्यत्र जातीयवाद झाल्याने आमच्या कमी जागा आल्याचे शहर कार्याध्यक्ष विनोद पाटील म्हणाले.
जातीनुसार मतदान झाले हे स्पष्टच -
शहरातील मतदार धर्माकडे बघून मतदान करताहेत हे या निवडणुकीतून स्पष्ट झाले. विकासाचा मुद्दा कोणीच केला नाही. एकीकडे युतीने एमआयएमची भीती दाखवत हिंदू मते घेतली, तर दुसरीकडे हिंदूची भीती दाखवत एमआयएमने मुस्लिम मते घेतली. त्यामुळे आम्ही मागे पडलो. सुभाष झांबड आमदार, काँग्रेस.
आम्ही निवडणूक प्रामाणिकपणे लढलो

आम्ही प्रामाणिकपणे लढलो. पण मतदार थेट दोन जातींत विभागले गेल्याचे दिसून येते. येथे फक्त जातीयवादच सुरू आहे. मतदानानंतरही लोकांच्या घरात घुसून मारले जाते, हे गंभीर प्रकार जातीच्या नावावर केले जातात. लोकांनी विकासाकडे दुर्लक्ष केले. आम्ही पुन्हा उभारी घेऊ. विनोद पाटील शहर कार्याध्यक्ष, राष्ट्रवादी
राजेंद्र दर्डा असते तर झाला असता पाच जागांचा फायदा

माजी शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा काँग्रेसकडून सक्रिय असते तर किमान पाच वॉर्डात निश्चित फायदा झाला असता. दर्डा यांना पूर्व मतदारसंघात पराभव स्वीकारावा लागला. तेथे मुस्लिमांनी त्यांच्यावर राग व्यक्त केला होता. मात्र, गेल्या काही महिन्यांत या रागाची तीव्रता कमी झाली आहे. काही भागात तर दर्डांविषयी सहानुभूती व्यक्त होत आहे. त्याचा आधार घेऊन त्यांनी प्रत्यक्ष संपर्क साधला असता किंवा तीन ते चार प्रचार फेऱ्या काढल्या असत्या तरी काँग्रेसच्या पाच जागा निश्चितच वाढल्या असत्या.