आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Congress Secretary Mohan Prakash Keep Asid Iftar Party And Go To Verul

काँग्रेस सरचिटणीस मोहन प्रकाश यांनी इफ्तार पार्टी टाळून शांतीगिरी महाराजांची घेतली भेट

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि महाराष्ट्राचे प्रभारी मोहन प्रकाश यांनी औरंगाबादेतील मुस्लिमांच्या भेटीगाठी घेऊन, इफ्तार पार्टीला हजेरी लावण्याऐवजी रविवारी (21 जुलै) वेरूळ येथे शांतीगिरी महाराजांची भेट घेण्यास प्राधान्य दिल्याने काँग्रेसमधील एक गट नाराज झाला आहे. आगामी लोकसभा निवडणुका लक्षात घेऊन त्यांनी ही भेट टाळायला हवी होती, असेही त्यांचे म्हणणे आहे.

जिल्ह्यात मुस्लिम समाज मोठय़ा संख्येने आहे. मात्र, महापालिका आणि सिल्लोड मतदारसंघ वगळता या समाजाच्या उमेदवारांना संधी दिली जात नाही. चुकून मिळालीच तर काँग्रेसचाच एक गट विरोधात काम करत असतो. त्यामुळे मतदार, कार्यकर्ते, पदाधिकार्‍यांमध्ये नेहमीच नाराजीचा सूर उमटत असतो. तो मोहन प्रकाश यांच्याकडेही व्यक्त करण्याची अनेकांची इच्छा होती. त्यासाठी काहीजणांनी इफ्तार पार्टीचे आयोजन करण्याचीही तयारी केली होती. प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांनी त्यासाठी पुढाकार घ्यावा, असा त्यांचा प्रयत्न होता.

मात्र, मोहन प्रकाश यांच्या औरंगाबाद जिल्हा दौर्‍याच्या वेळापत्रकात इफ्तार पार्टी किंवा मुस्लिम समाजाच्या पदाधिकार्‍यांशी भेटीगाठीचा समावेशच नव्हता. त्याऐवजी वेरूळ येथे जनार्दन स्वामींच्या आश्रमातील प्राथमिक शाळेच्या भूमिपूजनासाठी त्यांनी पाच तासांचा वेळ दिला होता. गेल्या लोकसभेत अपक्ष म्हणून निवडणूक लढविणारे शांतीगिरी महाराजांशी बंद खोलीत अर्धा तास चर्चाही केली. त्यामुळे काँग्रेसमधील एका गटात नाराजी पसरली आहे. एकीकडे इफ्तार पार्टीकडे पाठ फिरवली. दुसरीकडे हिंदुत्ववादाकडे झुकणार्‍या महाराजांना भरपूर वेळ दिला, असा भेदभाव कशामुळे, असा सवालही अनेकांनी नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर केला आहे. जिल्ह्यातील मुस्लिम नेहमीच काँग्रेसच्या पाठीशी उभे राहिले आहेत. रमजानच्या पवित्र महिन्यानिमित्त मोहन प्रकाश यांनी इफ्तार पार्टीसाठी वेळ देणे अत्यावश्यक होते. विंडसर कॅसल हॉटेलमध्ये ही पार्टी आयोजित करणे अशक्य नव्हते, परंतु स्थानिक पदाधिकार्‍यांनीही त्यांना जाणीवपूर्वक वेरूळला नेले. त्यात प्रदेशाध्यक्ष ठाकरेही सहभागी झाले, असा सूरही त्यांनी व्यक्त केला.


भेट घेणे चुकीचे नाही
माजी खासदार उत्तमसिंग पवार यांनी मोहन प्रकाश यांची पाठराखण केली. ते म्हणाले की, त्यांचा दौरा जनार्दन स्वामी आश्रमातील शाळेच्या भूमिपूजनासाठीच होता. या वेळी त्यांनी शांतीगिरी महाराजांची भेट घेण्यात चुकीचे नाही. वेळापत्रक आधीच ठरले असल्याने मुस्लिमांना त्यांनी टाळण्याचा प्रश्न उद्भवतच नाही.