औरंगाबाद - ज्योतीनगर वॉर्डातील शिवसेनेच्या उमेदवार सुमित्रा गिरजाराम हळनोर यांच्या विरोधातील काँग्रेसच्या उमेदवार सुनीला क्षत्रिय यांच्यावर शिवसेनेच्या नेत्यांनी दबाव आणला. त्यांचे दिवसभर अपहरण केले. त्यामुळे त्यांनी माघार घेतल्याचा आरोप आमदार सुभाष झांबड यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत केला. मात्र, क्षत्रिय यांनी त्याचा इन्कार केला. हिंदुत्व आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशामुळे मी माघार घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
झांबड म्हणाले की, क्षत्रिय यांनी अर्ज भरल्यापासून उमेदवारी मागे घेण्यासाठी अनेकदा शिवसेनेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी दबाव आणण्याचा प्रयत्न केला. या वॉर्डात केवळ सेना काँग्रेस या दोन पक्षाच्या उमेदवारांमध्येच मुख्य लढत होती. त्यात क्षत्रिय तीन दिवसांपूर्वी सेनेच्या असल्याने खासदार चंद्रकांत खैरे यांनी तीन तास त्यांच्या घरात ठिय्या मारला होता. मात्र, क्षत्रिय यांनी नकार दिल्याने त्यांचे अपहरण केले. या दबावाला बळी पडून त्यांनी माघार घेतली.
शुक्रवारी दिवसभरात काँग्रेसच्या श्रेष्ठींनी ७० बंडखोरांना अर्ज मागे घेण्यास भाग पाडले. त्यामुळे ९५ टक्के आमचे बंडखाेर कमी झाल्याचेही झांबड म्हणाले. येणाऱ्या महापालिकेत काँग्रेसचे किमान ६० नगरसेवक असतील, असेही ते म्हणाले. या वेळी माजी आमदार डॉ. कल्याण काळे, शहराध्यक्ष अॅड. सय्यद अक्रम, मनोज पाटील आदींची या वेळी उपस्थिती होती.
उद्धव ठाकरे यांचा फोन आला होता - सुनीला क्षत्रिय
अर्ज मागे घेण्यासाठी शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांनी अनेक प्रयत्न केले. आम्ही माघार घेतली नव्हती. मात्र, जेव्हा उद्धव ठाकरे यांचा फोन आला, तेव्हा आम्हाला उमेदवारी मागे घ्यावी लागली. कुणीही दबाव आणला नाही.