आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Congress State President Issue In Maharashtra, Askok Chavan

काँग्रेसच्या प्रचाराची धुरा आता अशोकरावांकडे सोपवा !

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- मतदारांना आकर्षित करण्याबरोबरच सभा गाजवणारे विलासराव देशमुख आता आपल्यात राहिले नाहीत. त्यामुळे पोकळी भरून काढण्यासाठी माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांना मैदानात आणावे, असा प्रस्ताव जिल्हा काँग्रेस कमिटीच्या बैठकीत सोमवारी मंजूर करण्यात आला.

येत्या 28 तारखेपासून काँग्रेसची जनजागरण रथयात्रा सुरू होत असून यात अशोकरावांचा समावेश असावा, अशी मागणी आमदार डॉ. कल्याण काळे, माजी आमदार नितीन पाटील यांनी केली, तर ही मागणी प्रदेशाध्यक्षांकडे नोंदवली जाईल, अशी ग्वाही जिल्हाध्यक्ष केशवराव औताडे यांनी दिली. जनजागरण रथयात्रेच्या तयारीसाठी गांधी भवनात ही बैठक बोलावण्यात आली होती. तालुकाध्यक्ष काकासाहेब कोळगे यांनी प्रस्तावनेतच अशोक चव्हाण यांची मागणी नोंदवली. अशोकराव आपल्या मराठवाड्याचे नेते आहेत. आता आपण त्यांच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे, अशी आग्रही मागणी केली. त्यानंतर माजी आमदार नितीन पाटील यांनी किमान कन्नड मतदारसंघात अशोकरावांचा कार्यक्रम ठेवा, अशी थेट मागणी केली. ते आपले नेते आहेत आणि जनता त्यांना मानते.

त्यांच्यानंतर माजी खासदार उत्तमसिंग पवार, माजी जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब ठोंबरे यांची भाषणे झाली. मात्र, या दोघांनी अशोकरावांवर भाष्य केले नाही. त्यानंतर डॉ. काळे बोलण्यास उभे राहिले. भाषणाची सुरुवातच त्यांनी अशोकरावांना मैदानात आणण्याची गरज असल्याचे म्हणत केली. जिल्ह्यात शक्य असेल तेथे अशोकरावांना आणलेच पाहिजे, असा आग्रह त्यांनी धरला. अशोकरावांची आपल्याला गरज असल्याचे माजी मंत्री अब्दुल सत्तार यांनीही व्यक्त केली. बैठकीचा समारोप करताना सदस्यांची मागणी प्रदेशाध्यक्षांकडे नोंदवली जाईल, असे औताडे यांनी सांगितले.

आपला वाटणारा नेता
विलासरावांच्या निधनानंतर आपला वाटणारा नेता फक्त अशोकरावांच्या रूपाने आहे. मराठवाड्यातील या नेतृत्वाच्या पाठीशी आपणच उभे राहिले पाहिजे, त्यांना पुढे आणले पाहिजे.
-डॉ. कल्याण काळे, आमदार.

कन्नडमध्ये सभा घ्या
अशोकराव निवडणुकीपूर्वीच आपल्याकडे आले पाहिजेत. अन्यत्र जमत नसेल तर चालेल, पण कन्नड विधानसभा मतदारसंघात त्यांच्या सभा व्हाव्यात ही माझी मागणी आहे.
-नितीन पाटील, माजी आमदार, कन्नड.

ठाकरे यांना कळवू
काँग्रेसजनांची मागणी रास्त आहे. ही मागणी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्याकडे कळवली जाईल. जिल्ह्यात त्यांच्या जास्तीत जास्त सभा घेण्यावर आमचा भर राहील.
-केशवराव औताडे, जिल्हाध्यक्ष, काँग्रेस.