आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Congress Vs Shiv Sena In Aurangabad State Assembly Election

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

काँग्रेसचे सुभाष झांबड-शिवसेनेचे किशनचंद तनवाणी थेट भिडणार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- तिरंगी लढत झाली तरच काँग्रेसचा पराभव होऊ शकेल, ही शक्यता यंदाही होती. गतवेळचा अनुभव असल्याने सुभाष झांबड यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांशी केलेली शिष्टाई कामाला आली आणि राष्ट्रवादीचे दोघे, काँग्रेस व अपक्ष प्रत्येकी 1 अशा चौघांनी रिंगणातून माघार घेतली आणि 19 ऑगस्टला होणार्‍या औरंगाबाद-जालना स्थानिक संस्था निवडणुकीत झांबड विरुद्ध शिवसेनेचे किशनचंद तनवाणी अशी लढत होणार हे स्पष्ट झाले. सरळ लढत होणार असल्याने घोडेबाजारालाही चाप बसल्याची चर्चा आहे.

उमेदवारी अर्ज मागे घेण्याची सोमवार शेवटची तारीख होती. दुपारी एक वाजेपर्यंत सहा उमेदवार रिंगणात होते. कोण-कोण माघार घेणार यावर राजकीय वर्तुळात चर्चा सुरू होती. दीड वाजता अभिजित देशमुख यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला. त्यानंतर 20 मिनिटांनी फेरोज पटेल पोहोचले. त्यांच्यानंतर पाचच मिनिटांनी शाहनवाज खान यांनीही अर्ज मागे घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात धाव घेतली. मात्र, मनोहनसिंग ओबेरॉय आले नव्हते. ते लढतात की काय, अशी चर्चा सुरू झाली होती. मात्र, ‘मोठय़ा साहेबांचा आदेश आला’ असे सांगत ओबेरॉय 2 वाजून 40 मिनिटांनी जिल्हाधिकार्‍यांसमोर उभे राहिले. त्यांनीही अर्ज मागे घेतला.

माघार घेणार्‍यांत दोघे राष्ट्रवादीचे, दोघे काँग्रेसचे
सरळ लढतीत पहिल्या क्रमांकाला संधी : सरळ लढतीत पहिल्या पसंतीत जो पहिल्या क्रमांकावर राहील, तो आमदार होणार हे नक्की. मतांचा कोटा पूर्ण न झाल्यास दुसर्‍या क्रमांकावरील उमेदवाराला मिळालेल्या दुसर्‍या पसंतीच्या मतांची मोजणी केली जाईल, तरीही कोटा पूर्ण झाला नाही तरी पहिल्या क्रमांकावरील उमेदवाराला विजयी घोषित केले जाईल.

2007 मध्ये असे झाले मतदान
काँग्रेसकडून अब्दुल सत्तार, शिवसेनेकडून किशनचंद तनवाणी आणि सुभाष झांबड अशी तिरंगी लढत होती. पहिल्या पसंतीत सत्तार यांना 175, तनवाणी यांना 143, तर झांबड यांना 137 मते मिळाली. त्यामुळे झांबड यांना मिळालेल्या दुसर्‍या पसंतीच्या मतांची मोजणी झाली. त्यात तनवाणी यांनी बाजी मारून मताधिक्य 250 पर्यंत नेले आणि सत्तार यांचा पराभव झाला. तनवाणी यांचा कोटा पूर्ण न झाल्याने सत्तार यांना मिळालेल्या दुसर्‍या पसंतीच्या मतांची मोजणी झाली आणि तनवाणी यांना विजयी घोषित केले.

घोडेबाजाराला लागणार चाप
2007 च्या निवडणुकीत शेवटच्या क्षणी काही मतदारांना पैसा दिला गेल्याची चर्चा होती. तनवाणी यांना पक्षाचे मतदान मिळवण्यासाठी सर्वार्थाने प्रयत्न करावे लागले होते. यंदाही तिरंगी लढत झाली तर जास्त पैसे मतदारांना द्यावे लागतील, अशी अनेकांची अटकळ होती. मात्र, यंदा सरळ लढत होणार हे स्पष्ट झाले आणि त्याबरोबरच मतदारांना पैसे मिळणार नाहीत हेही स्पष्ट झाले. थेट लढत होणार असल्याचे समजल्यानंतर 15 अपक्ष नगरसेवकांनी मनपात एकत्र येऊन चिंता व्यक्त केली. काही करता येईल का, असा त्यांच्या चर्चेचा सूर होता.

आघाडी असल्याने ‘त्यांची’ माघार
काँग्रेस, राष्ट्रवादीची आघाडी असल्याने त्यांच्या उमेदवारांनी माघार घेतली. आघाडी असल्यामुळे अजित पवार यांना विनंती केली. आघाडीसोबतचे मतदार नंतर स्पष्ट होतील.
-सुभाष झांबड, उमेदवार, काँग्रेस.

आघाडीचा धर्म पाळला
माघार घेण्याचा आदेश श्रेष्ठींकडून आल्याने आमच्या दोन्हीही उमेदवारांनी माघार घेतली. आघाडीचा धर्म आम्ही पाळला असून आमचाच उमेदवार विजयी होण्यासाठी आम्ही प्रयत्न करू.
- विनोद पाटील, शहर कार्याध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस.

जिंकण्याचा प्रयत्न करणार
अन्य उमेदवारांनी माघार घेतल्याचे समजते. तरीही ही निवडणूक आहे. त्यामुळे आम्ही जिंकण्याचा प्रयत्न करणार आहोत. घोडेबाजार होणार नसल्याने तनवाणी विजयी होतीलच.
- चंद्रकांत खैरे, खासदार, शिवसेना