आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिला काँग्रेसच्या आंदोलनाने शहर भाजपमध्ये खळबळ

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - काँग्रेसच्या महिलांनी भाजपच्या उस्मानपुरा येथील कार्यालयासमोर केलेल्या निषेधाच्या घोषणामुळे भाजपमध्ये चांगलीच खळबळ उडाली. अचानक झालेल्या निदर्शनामुळे भाजपचे नेते हबकून गेले. फक्त बारा महिलांनी केलेल्या आंदोलनानंतर भाजपच्या शंभरपेक्षा जास्त पदाधिकार्‍यांनी क्रांती चौक पोलिस ठाणे गाठून निषेध नोंदवला.

भाजपच्या उस्मानपुरा कार्यालयासमोर दुपारी चारच्या सुमारास काँग्रेसच्या महिला पदाधिकार्‍यांनी नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. या वेळी पक्ष कार्यालयात शिपायाशिवाय कोणीही नव्हते. बघता बघता ही बातमी भाजपच्या पदाधिकार्‍यांमध्ये पसरली. पक्ष कार्यालयावर हल्ला झाला, अशी चर्चाही झाली. मात्र, केवळ निदर्शने करण्यात आल्याचे त्यानंतर समजले. भाजापच्या कार्यालयासमोरच आंदोलनाची हिंमत दाखवल्यामुळे भाजपच्या पदाधिकार्‍यांनी गंभीर दखल घेत क्रांती चौक पोलिस ठाणे गाठले. मोदींमुळे काँग्रेस बिथरली आहे. त्यामुळे हे आंदोलन केवळ काँग्रेसचा ‘छाछूपणा’ असल्याची प्रतिक्रिया भाजपचे शहराध्यक्ष बापू घडामोडे यांनी दिली. क्रांती चौक पोलिसांनी जमावबंदी कलम लागू केलेले असताना बंदी झुगारून नियमबाह्य आंदोलन होत असेल तर त्यावर कारवाई झाली पाहिजे. याचे पडसाद उमटल्यास त्याला काँग्रेस जबाबदार राहील, असे मत भाजप नेत्या विजया रहाटकर यांनी व्यक्त केले. या वेळी भागवत कराड, संजय केणेकर, माधुरी अदवंत, नंदकिशोर चरखा उपस्थित होते.