आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Congress Workers Opposed Alliance With Nationalist Congress

राष्ट्रवादीशी आघाडीला कॉंग्रेस कार्यकर्त्यांचा विरोध

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - औरंगाबाद महानगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादीसोबत आघाडी करण्याच्या हालचाली सुरू झाल्याचे समजताच काँग्रेस कार्यकर्त्यांनी बुधवारी दुपारी गांधी भवनात निदर्शने केली. कोणत्याही परिस्थितीत सर्वच्या सर्व जागा काँग्रेसने लढाव्यात, राष्ट्रवादीला जागा देऊ नयेत, असे या कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.

गांधी भवनात निदर्शने झाली त्या वेळी शहर महिला आघाडीच्या अध्यक्षा डॉ. विमल मापारी, सचिव कल्पना नेवारे, अनुसूचित जाती सेलचे शहर उपाध्यक्ष नंदू साळवे, भास्कर मोरे, गौतम गंगावणे, बाबूराव वाकेकर, कुमार मगर, ऋषिकेश महाजन यांच्यासह काँग्रेसच्या विविध
सेलचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

काँग्रेसने गेल्या आठवड्यात मनपा निवडणुकीसाठी इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या होत्या. त्यावेळी शहरातील ११३ वॉर्डापैकी प्रत्येक वाॅर्डातून सरासरी चार ते पाच इच्छुक मुलाखतीसाठी आले होते. मोदी लाट तसेच एमआयएमच्या लाटेत काँग्रेसला उमेदवार मिळणार नाही, असे चित्र होते, परंतु काही दिवसांत हे चित्र बदलले. त्यामुळे काँग्रेसच्या जागा नक्कीच वाढू शकतात. राष्ट्रवादीला शहरात जागा मिळणार नाही, त्यामुळे त्यांना सोबत घेऊन आपल्या कार्यकर्त्यांना निवडणूक लढवण्यापासून दूर का ठेवावे, असा सवाल कार्यकर्त्यांनी केला. सर्व ११३ जागा लढल्यास काँग्रेसच्या नगरसेवकांची संख्या वाढेल, त्यामुळे राष्ट्रवादीला सोबत घेऊ नये, असे कार्यकर्त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, अजून राष्ट्रवादीसोबत आघाडीच झालेली नाही. फक्त बोलणी सुरू आहे. तेव्हा कार्यकर्त्यांनी उगाच घाई करू नये, असे कोअर कमिटीचे सदस्य, आमदार अब्दुल सत्तार यांनी म्हटले आहे. कार्यकर्त्यांच्या मताचा मान राखला जाईल, असेही ते म्हणाले.

वाॅर्डात कार्यकर्त्यांत स्पर्धा
काँग्रेसला येथे चांगले वातावरण आहे. प्रत्येक वाॅर्डात कार्यकर्त्यांत स्पर्धा आहे. अशा परिस्थितीत जर आघाडी झाली तर कार्यकर्ते नाराज होतील. त्यामुळे राष्ट्रवादीला एकही जागा काँग्रेसने सोडू नये. सर्वत्र कार्यकर्त्यांना लढू द्यावे, अशी मागणी आम्ही प्रदेशाध्यक्षांकडेही करणार आहोत.
डॉ. विमल मापारी महिला शहराध्यक्षा, काँग्रेस
वाचा.. युतीच्या घडामोडीकडे काँग्रेस-राष्ट्रवादी पदाधिका-यांचे लक्ष