आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फुलंब्रीत कॉँग्रेस स्वबळावर लढणार

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

फुलंब्री - जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत काँग्रेस कार्यकर्त्यांनी आघाडीचा विचार न करता स्वतंत्रपणे रिंगणात उभे राहण्याची तयारी करावी, असे आवाहन काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष केशवराव औताडे यांनी केले.
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोमवारी काँग्रेस पक्षाचा तालुका मेळावा झाला त्या वेळी ते बोलत होते. याप्रसंगी आमदार डॉ. कल्याण काळे, तालुकाध्यक्ष सुदाम मते, शिवाजीराव पाथ्रीकर, संदीप बोरसे आदींची उपस्थिती होती. या वेळी औताडे म्हणाले की, आता कार्यकर्त्यांनी सावध होण्याची गरज आहे. मीच नेता व माझा पक्ष अशी भूमिका घेतल्यास काँग्रेसला कोणतीच निवडणूक जड जाणार नाही. नुकत्याच संपलेल्या नगरपालिकेच्या निवडणुकीत जनतेने काँग्रेस पक्षावर विश्वास दाखवला आहे. या निवडणुकांपासून मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे व पालकमंत्री बाळासाहेब थोरात यांनी औरंगाबाद जिल्हा हा काँग्रेसचा बालेकिल्ला जाहीर केला आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी न डगमगता जिल्हा परिषद व पंचायत समिती ताब्यात घेण्यासाठी सज्ज व्हावे. त्यासाठी आघाडीचा विचार सोडून द्यावा, असे आवाहन केले.
या वेळी डॉ. कल्याण काळे म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेसने आपल्याला विधानसभेत सहकार्य केले म्हणून जिल्हा परिषद निवडणुकीसाठीसुद्धा आघाडी व्हावी, अशी माझी इच्छा होती. मात्र, जिल्हा परिषदेत 4 जागा असून त्यापैकी 3 जागा राष्ट्रवादी मागत असल्याने काँग्रेस कार्यकर्त्यांनी जायचे कुठे? याच कारणामुळे आघाडीचा प्रयत्न सोडून दिला असून आता काँग्रेसच्या उमेदवारांना सर्व शक्तीनिशी मदत करावी, असे आवाहन काळे यांनी केले. डॉ. नामदेव गाडेकर, शिवाजीराव पाथ्रीकर, कचरू मैंद यांची भाषणे झाली.