आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विद्यापीठांमधील अभ्यासक्रमांत येणार समानता

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - राज्यातील सर्वच विद्यापीठांमध्ये ‘कॉमन क्रेडिट ग्रेडिंग सिस्टिम’ (सीसीजीएस) राबवण्यात येणार असून, त्याअंतर्गत विद्यापीठांना दरवर्षी ग्रेड देण्यात येईल. सर्व विषयांना क्रेडिट पॉइंट्स देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. त्याचप्रमाणे राज्यातील सर्वच विद्यापीठांतील सर्व विषयांतील पदवी-पदव्युत्तर अभ्यासक्रमाबाबत सारखेपणा आणण्याचा प्रयत्न केला जाईल, अशी माहिती डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विजय पांढरीपांडे यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली.

मुंबईतील राजभवनात दोन सप्टेंबर रोजी ‘जॉइंट बोर्ड ऑफ व्हाइस चॅन्सलर’ (जेबीव्हीसी) ही राज्यातील कुलगुरूंची संयुक्त बैठक झाली. राज्यपाल के. शंकरनारायणन, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री राजेश टोपे, राज्यमंत्री डी. पी. सावंत आदींच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत विविध निर्णय झाले. याविषयी कुलगुरू म्हणाले, अग्रवाल समितीचे पालन करण्याविषयी ‘जेबीव्हीसी’मध्ये सूचना करण्यात आली असून, त्याचे पालन येथील विद्यापीठात सुरू झाले आहे. विद्यापीठांमधून मोठय़ा प्रमाणावर संशोधन होऊन पेटंट घेण्याची अधिकाधिक अपेक्षा केली जात आहे. उर्वरित पान.8

विद्यापीठांमधील अभ्यासक्रमांत येणार समानता
मात्र अनेक विद्यापीठांमध्ये संशोधन होत असले तरी पेटंट घेण्याविषयी पाहिजे त्या प्रमाणात जागृतता नाही. त्यामुळेच ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्या अध्यक्षतेखाली ‘पेटंटस अँड इनोव्हेशन्स’ ही खास समिती स्थापन झाली आहे. त्याअंतर्गत पेटंटसविषयी जागृतता आणण्याचा प्रयत्न होणार आहे. सौर व पवन उज्रेचा विद्यापीठ परिसरात अधिकाधिक वापर व्हावा, अशी अपेक्षाही कुलगुरूंच्या बैठकीत व्यक्त झाली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात हा उपक्रमही राबविण्यात येत असल्याचे डॉ. पांढरीपांडे यांनी सांगितले.

मुंबई विद्यापीठात झालेल्या ‘व्हचरुअल क्लासरूम’च्या धर्तीवर सर्व विद्यापीठांमध्ये अशी क्लासरूम व्हावी, अशी सूचना ‘जेबीव्हीसी’त करण्यात आली. या पार्श्वभूमीवर विद्यापीठातील ‘सेंट्रल फॅसिलिटी बिल्डींग’मध्ये ही सुविधा उपलब्ध केली जाणार असून, त्यासाठी सव्वा कोटी रुपयांची मागणी करण्यात आली आहे. पुणे-मुंबई किंवा कुठल्याही विद्यापीठातील तज्ज्ञ-संशोधकांचे लेक्चर येथील विद्यार्थ्यांना पाहता-ऐकता येईल किंवा येथील प्राध्यापकांचे लेक्टर कुठल्याही विद्यापीठातील विद्यार्थ्यांना पाहता येईल.