आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सैन्यदलाच्या "युवक जोडो' अभियानाचा श्रीगणेशा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - ग्रामीण भागातील तरुणांना सैन्य दलात भरती होण्यासाठी प्रोत्साहित करण्याच्या उद्देशाने औरंगाबादच्या ४१ आर्टिलरी डिव्हिजनच्या वतीने आयोजित १२ दिवसांच्या सायकल अभियानास मेजर जनरल दीपक धांडा यांनी रविवारी (९ नोव्हेंबर) वेरूळ येथे हिरवी झेंडी दाखवली. एका अधिकाऱ्यासह सोळा जवानांचे पथक ४५२ कि.मी. अंतर पार करणार आहे. या अभियानाचा समारोप मुंबईत गेट वे ऑफ इंडिया येथे होणार आहे. समाजातील तरुणांसह दोन पर्यटनस्थळांना अभियानाच्या माध्यमातून जोडले जाणार असल्याचे याप्रसंगी मेजर जनरल धांडा यांनी स्पष्ट केले.
लढाईच्या मैदानात शौर्य गाजवणाऱ्या भारतीय सैन्यदलाकडून साहसी अभियान व सामाजिक उपक्रमांनाही प्राधान्य दिले जाते. सैन्याच्या ४१ आर्टिलरी डिव्हिजनच्या वतीने काढण्यात आलेल्या सायकल अभियानाचे समारंभपूर्वक आयोजन २२ मेडियम रेजिमेंटच्या वतीने करण्यात आले होते. याप्रसंगी ९७ आर्टिलरी ब्रिगेडचे ब्रिगेडियर मनोजकुमार, ब्रिगेडियर ए. गांगुली, कर्नल कुणाल मुखर्जी, लेफ्टनंट कर्नल राजेश सहा आदींची प्रमुख उपस्थिती होती. मराठवाड्यासह राज्यातील अनेक भागातील तरुण सैन्यदलात येण्यास उत्सुक नसल्याने अशा तरुणांना सैन्यदलात येण्यासाठी प्रोत्साहित करण्याचा उद्देश या अभियानाचा आहे.
गावखेड्यांत करणार प्रबोधन
सायकल मोहिमेवर निघालेले सोळा जवान महाराष्ट्रातील गाव-खेड्यांमध्ये जाऊन तरुणांसह गावकऱ्यांचे प्रबोधन करणार आहेत. सैन्यदलात रोजगाराच्या संधी कशा उपलब्ध आहेत, यासंबंधी ते माहिती देतील. या वेळी तरुणांना माहितीपत्रके दिली जातील. सैन्यात प्रवेशासाठी किती शिक्षण आवश्यक आहे, वयाची अट, सैनिक आणि अधिकारी म्हणून भरती होण्यासाठी काय करावे यासंबंधीची माहिती दिली जाणार आहे.

अनुभवकथन करणार
सायकल अभियानाच्या मार्गावर जवानांच्या स्वागतासाठी प्रत्येक तालुक्यातील तहसीलदार पुढाकार घेत असून गावात जवानांच्या अभियानाचा लाभ तरुण व गावकऱ्यांनी घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. जवान ज्या गावात मुक्काम करतील तेथे ग्रामस्थांना आपले अनुभव सांगणार आहेत. आपल्या मुलाचे भवितव्य सैन्यदलात किती उज्ज्वल आहे, याची माहितीही ते देतील.
चिमुकल्यांच्या अभियानाला शुभेच्छा
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लेफ्टनंट कर्नल राजेश सहा यांनी केले. याप्रंसगी अग्निबाज पूर्व प्राथमिक शाळेतील ५२ चिमुकल्या विद्यार्थ्यांनी आपली उपस्थिती नोंदवून अभियानास शुभेच्छा दिल्या. त्यांच्या संगीत शिक्षिकेसह विद्यार्थ्यांनी राष्ट्रगीत सादर केले. याप्रसंगी अग्निबाज शाळेच्या मुख्याध्यापिका लीना आयसॅक, प्रियदर्शिका मुखर्जी, जयश्री दामोदरन, रती विझ, सुगंधी मोकाशी आदींची उपस्थिती होती.