आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्‍यात पावसाची संततधार, कोकणात पूरस्थिती; जनजीवन विस्कळि‍त

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

काही दिवसांची विश्रांती घेतल्‍यानंतर राज्‍यात पुन्‍हा दमदार पावसाला सुरुवात झाली आहे. उत्तर महाराष्‍ट्रातील काही भाग वगळता विदर्भापासून तळकोकणापर्यंत संपूर्ण राज्‍यात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. कोकणात पूरस्थिती निर्माण झाली असून जनजीवनावर परिणाम झाला आहे. कोकणात रेल्‍वे आणि रस्‍ते वाहतूक अतिशय धीम्‍या गतीने सुरु आहे. तर यवतमाळ आणि वर्धा जिल्‍ह्यात सकाळपासून रस्‍ते वाहतूक प्रभावित झाली आहे. पावसाचा जोर आणखी दोन ते तीन दिवस कायम राहणार असून राज्‍यात काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्‍याने व्‍यक्त केला आहे.

जूनमध्‍ये राज्‍यात दमदार पाऊस पडला. मात्र, उत्तर महाराष्‍ट्र, पश्चिम महाराष्‍ट्रातील काही भाग आणि मराठवाड्यात तुलनेने कमी पाऊस पडला. जूनच्‍या अखेरच्‍या आठवड्यापासून पावसाने विश्रांती घेतली होती. त्‍यानंतर आता 2 जुलैपासून राज्‍यात पुन्‍हा मान्‍सून सक्रीय झाला आहे. दोन दिवसांपासून विदर्भात मुसळधार पाऊस सुरु आहे. पावसामुळे नागरिक घराबाहेरच पडले नाहीत. रस्‍ते वाहतुकीवरही परिणाम झाला आहे. आज बुधवारी दुपारी 1 वाजेपर्यंत यवतमाळ बस डेपोतून मोजक्‍याच बसेस सोडण्‍यात आल्‍या.

चंद्रपूर जिल्‍ह्यातही दमदार पाऊस सुरु आहे. जिल्‍ह्यात गेल्‍या 24 तासांमध्‍ये 482 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. चंद्रपूर शहरात पठाण गेटजवळ झरपट नदीचा जुना पुल पाण्‍याने वाहून गेला. अमरावतीमध्‍येही आज सकाळपासून संततधार पाऊस सुरु आहे. कोयना, महाबळेश्‍वरमध्‍येही दुपारी 12 वाजतापासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे.

पुणे जिल्‍ह्यातही दोन दिवसांपासून दमदार पाऊस सुरु आहे. विशेष म्‍हणजे, धरणक्षेत्रात पावसाची संततधार सुरु आहे. त्‍यामुळे धरणांच्‍या पाणीसाठ्यात वाढ झाली आहे.

सोलापुरातही दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. त्‍यामुळे दुष्‍काळाने होरपळलेली जनता सुखावली आहे.

पो‍लादपूर येथे पावसाचा बळी

पोलादपूर तालुक्यातील लहुळसे येथील आकाश गोपाळ रिंगे हा 13 वर्षीय मुलगा वाहून गेला. शाळेतून घरी परत येत असताना अचानक ओढ्याचा पाण्याचा लोंढा आल्याने तो वाहून गेला. त्याचा मृतदेह सापडल्याची माहिती तहसीलदार रामदास सायगावकर यांनी यांनी दिली.