आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आधी झाली चूक, नंतर खुन्नस... ठेकेदार करणार चक्क फुकट सर्वेक्षण

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद टक्क्यांच्या काळात कुणी फुकटात मनपाचे काम करेल यावर तुमचा विश्वास बसेल का? पण आता विश्वास ठेवावा लागेल. एका ठेकेदाराने चुकून दहा टक्के कमी दराऐवजी १०० टक्के कमी दराने निविदा भरली आणि सारेच अवाक् झाले.
चूक झाल्यावरही या ठेकेदाराने आपल्या स्पर्धकाला काम मिळू नये यासाठी १०० टक्के कमी दराने म्हणजे शब्दश: फुकट काम करण्याची तयारी दाखवली आहे. या अजब प्रकारानंतर या ठेकेदाराकडून रीतसर डिपाॅझिट घेण्याचे काम योग्यच होईल, असे हमीपत्र घेण्याचे ठरवत त्यालाच काम देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

शुक्रवारी मनपाची सर्वसाधारण सभा होती. त्यात हा प्रकार उघडकीस आला. सभागृह नेते राजेंद्र जंजाळ यांनी याबाबत एक प्रस्ताव मांडला होता. १०० टक्के कमी दराने सादर केलेली निविदा मंजूर केली असेल, तर त्या ठेकेदाराकडून ते काम योग्य तऱ्हेने करवून घेण्याची जबाबदारी अधिकाऱ्यांनी स्वीकारावी. जेव्हा हा विषय निघाला तेव्हा सगळ्यांना धक्काच बसला; पण कार्यकारी अभियंता सिकंदर अली यांनी यावर काम चांगलेच होणार याची जबाबदारी घेतली.

काम घरकूल योजना सर्वेक्षणाचे
अनुसूचितजाती जमातीच्या नागरिकांसाठी असणाऱ्या घरकुल योजनेसाठी सर्वेक्षण करण्याचे पाच लाख रुपयांचे हे काम आहे. निविदा मिळवणाऱ्या संस्थेने या योजनेसाठी लाभार्थी शोधणे त्यांच्याकडून अर्ज घेण्याचे काम करायचे आहे. या कामाच्या निविदा आल्या आणि उघडल्या तेव्हा सगळे अधिकारी अवाक् झाले. गौर खान या ठेकेदाराने चक्क १०० टक्के कमी दराने काम करण्याची तयारी दाखवत ही निविदा भरली होती. दुसऱ्या क्रमांकाची निविदा साडेेचार टक्के कमी दराची होती.

चूक आणि जिद्द
याबाबतसंबंधित ठेकेदाराला विचारले असता त्याने निविदा भरताना आपल्याला दहा टक्के कमी दराने असे भरावयाचे होते, पण चुकून एक शून्य जास्तीचा पडला, असे सांगितल्याचे कार्यकारी अभियंता सिकंदर अली यांनी सांगितले; पण सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार गौर खान यांना चूक झाली असल्याने तुम्ही माघार घेऊन काम नाकारणार का, असे विचारण्यात आले. पण स्पर्धकांना काम मिळू नये याच जिद्दीपोटी त्यांनी पदरचे पैसे गेले तरी चालतील; पण आपणच काम करणार असल्याचे स्पष्ट केल्याने सर्वात कमी दर सांगणारी ही निविदा मंजूर करण्यात आली.

शपथपत्र घ्या : यावरजंजाळ यांनी फुकट काम करणार असेल तर ते चांगले होईल याची खात्री घ्या आणि रस्त्यांसाठीही असे ठेकेदार शोधा, असा मार्मिक टोला लगावला. एमआयएमचे गटनेते नासेर सिद्दिकी यांनी मनपाने अशा ठेकेदारांचा सत्कार करावा, असे म्हटले. या मिश्किल चर्चेनंतर संबंधित ठेकेदाराकडून नियमानुसार डिपाॅझिट भरून घेतल्याचे सिकंदर अली यांनी सांगितले. तसेच काम चांगलेच होईल याचे हमीपत्र घेण्यात येईल, असेही घोषित केले.