आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ठेकेदार आता रस्त्यावरचे खड्डेही बुजवणार मोफत, रस्त्यांचे नशीब पालटणार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- मनपा आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारल्यावर सुनील केंद्रेकर यांनी रस्त्यांवर लक्ष केंद्रित केले आहे. दयनीय आणि लक्तरांसारखी अवस्था झालेल्या रस्त्यांचे नशीब पालटणार आहे.
मनपाची एवढी कामे मिळवता, करता, मग आमच्यासाठी पॅचवर्क फुकट करून द्या, अशी केंद्रेकरांची ‘विनंती’ दोन ठेकेदारांनी मानली असून लवकरच काही रस्त्यांची पॅचवर्कची कामे ते सुरू करणार आहेत. दरम्यान, केंद्रेकर रुजू होताच संत तुकोबानगरच्या काँक्रीट रस्त्याच्या कामाचेही नशीब उजाडले आहे. आधीचे काम वरचा थर टाकून उरकण्यात आले होते, आता दुसरा भाग करताना चक्क व्यवस्थित दोन फूट खोल खोदकाम करून कामाला प्रारंभ झाला आहे.

केंद्रेकरांनी आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर जशी मनपाच्या अधिकाऱ्यांत धडकी भरली, तसेच आता रस्त्यांची कामे करणाऱ्या ठेकेदारांमध्येही भीतीचे वातावरण आहे. पहिल्या दोन दिवसांत सर्वसाधारण सभांना हजेरी लावल्यानंतर त्यांच्याकडे येणाऱ्या तक्रारींनंतर केंद्रेकरांनी रस्त्यांना प्राधान्य दिले आहे. त्यांनी शुक्रवारी ठेकेदारांना बोलावून घेतले त्यांच्याकडून कामांबाबत माहिती घेतली.
कोणती कामे आहेत, आतापर्यंत किती रुपयांची कामे झाली, कोणती कामे सुरू आहेत, याची माहिती घेताना त्यांनी पॅचवर्कचा विषय काढला. आतापर्यंत मनपाची अनेक कामे तुम्ही घेतली. मनपाची सध्या पॅचवर्कवर खर्च करण्यासारखी स्थिती नाही. इतकी कामे केली, आता आमच्यासाठी पॅचवर्क विनापैशाचे करा, अशी आपल्या शैलीत त्यांनी विनंती केली. यावर काही ठेकेदारांनी पॅचवर्कची कामे करण्याचे मान्य केले असून लवकरच काही रस्त्यांच्या नशिबातील खड्डे भरले जाणार आहेत.

ठेकेदार अलर्ट
राज्यसरकारने दिलेल्या २४ कोटींच्या निधीतून होत असलेल्या पाच रस्त्यांपैकी संत तुकोबानगरमधील काँक्रीट रस्त्याचे काम निकृष्ट असल्याबाबत ‘दिव्य मराठी’ने सातत्याने वृत्तांकन केले. ठेकेदाराने वरवर खोदकाम करून थेट स्लॅब टाकला होता. त्याबाबत नागरिकांनी ओरड करूनही मनपाने काहीच केले नाही. याच रस्त्याची दुसरी बाजू करण्याचे काम बाकी होते. केंद्रेकर रुजू होताच ठेकेदाराने दोन फूट खोल खोदकाम करून रस्त्याची दुसरी बाजू तयार करण्यास प्रारंभ केला आहे.

पानझडेंना नोटीस
२४ कोटींच्या रस्त्यांच्या कामासाठी पीएमसी नेमताना निविदाच काढली नव्हती, असे सभागृह नेता राजेंद्र जंजाळ यांनी सर्वसाधारण सभेत सांगितले होते. अधिकाऱ्यांनीही तसे मान्य केले. यावर केंद्रेकरांनीही निविदा काढायलाच हवी होती, असे स्पष्टपणे म्हटले होते. शनिवारी या प्रकरणात आयुक्त केंद्रेकरांनी शहर अभियंता सखाराम पानझडे यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. सध्या पानझडे रजेवर असून बुधवारी मनपात आल्यावर ते या नोटिसीला उत्तर देणार आहेत.