आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Contractor Unable To Get A Place For The PumpsHouse Of Samantar Project

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

चालढकल: समांतर योजनेच्या ठेकेदाराला पंपहाऊससाठी जागा मिळेना!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- औरंगाबादकरांसाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या समांतर जलवाहिनीचे काम सुरू करण्याचे किमान दहा मुहूर्त यापूर्वी खासदार चंद्रकांत खैरे यांनी जाहीर केले. दोन महिन्यांपूर्वी समांतरच्या ठेकेदाराने तातडीने कामाचे भूमिपूजन होईल, असे म्हटले होते. प्रत्यक्षात जायकवाडी येथे ठेकेदाराला पंपहाऊससाठी अपेक्षित जागाच मिळत नसल्याचे समोर आले आहे.
दुसरीकडे पाण्याचे संकट दिवसेंदिवस गडद होत असून हर्सूल गावातील नागरिकांचे हाल होत आहेत. नवीन महापौर त्र्यंबक तुपे, उपमहापौर प्रमोद राठोड यांनी एप्रिलअखेरीस कार्यभार स्वीकारला.
त्यानंतर त्यांनी समांतरच्या वतीने मुख्य पाइपलाइनचे काम पंधरा दिवसांत सुरू केल्यास करारानुसार डेडलाइन देऊन नोटीस बजावण्याचे आदेश मनपाच्या अधिकाऱ्यांना दिले होते. त्यानुसार समांतरच्या अधिकाऱ्यांनी दुसऱ्याच दिवशी जायकवाडी येथील महापालिका पंपहाऊसलगतच्या जागेची पाहणी केली होती. तेथे कालव्याचे पाणी उपसून समांतरच्या पंपहाऊससाठी जागा उपलब्ध करून घेण्याचे नियोजनही केले होते. त्याचे पुढे काय झाले, याची माहिती ‘दिव्य मराठी’ प्रतिनिधीने घेतले असता अद्यापही हे काम केवळ पाहणी आणि कागदावरच असल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे मनपाच्या अधिकाऱ्यांना घेऊन पंपहाऊसजवळ पाहणी करून पाणी उपसा करण्याचे कामही सुरू केले होते. ते अद्यापही संपले नाही.
शहरात हाल : शहरातील अनेक भागात अगोदरच पाण्याचा तुटवडा जाणवत आहे. जायकवाडीतील सध्याच्या पंपहाऊसमध्ये असणाऱ्या विहिरींत गाळ, कचरा अडकल्याने उपसा कमी झाला आहे. दुसरीकडे जुन्या शहरातील आठ लाख नागरिकांची तहान भागवणारा हर्सूल तलावही कोरडाठाक पडला आहे. या पार्श्वभूमीवर समांतरच्या मुख्य जलवाहिनी टाकण्याचे, पंपहाऊस उभारणीचे काम वेगात सुरू व्हावे, अशी अपेक्षा लोक व्यक्त करत आहेत.
पाण्याचे वाटेकरी
जुन्या शहरातील नागरिकांना हर्सूल तलावातून नियमित आठ ते दहा एमएलडी पाणी उपसा करण्यात येत होता. उर्वरित शहरासाठी १२५ एमएलडीपेक्षा जास्त पाणी उपसा जायकवाडीतून करण्यात येत असतो. हर्सूल तलाव कोरडा झाल्याने उपलब्ध १२५ मधील दहा एमएलडी पाणी जुन्या शहराला दिले जात आहे. म्हणूनही उर्वरित शहराच्या पाणीपुरवठ्यावर परिणाम होत असल्याचे मनपा अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
- जायकवाडी ते औरंगाबाद पाइपलाइनचे काम समांतरमध्ये मुख्य आहे. या कामाबाबत कंपनी अधिकाऱ्यांच्या संपर्कात आपण असून त्याचा पाठपुरावा केला जात आहे. जूनअखेरीस काम सुरू होईल.
सखाराम पानझडे, शहर अभियंता
अद्याप कळालेले नाही
- जायकवाडी ते औरंगाबाददरम्यान मुख्य पाइपलाइनचे काम नेमके कधी सुरू होणार हे कळालेले नाही, पण शहरातील अंतर्गत कामे आता सुरू होणार आहेत. मुख्य जलवाहिनीचे काम सुरू करण्याची सूचना केली आहे.
त्र्यंबक तुपे, महापौर
हर्सूलमुळे ताण वाढला
- हर्सूल तलावातील पाणी संपल्याने जायकवाडीच्या पंपहाऊसवर ताण वाढला आहे. तो कमी करण्यासाठी नवीन पंपहाऊस उभारणे महत्त्वाचे आहे. त्यादृष्टीने अपेक्षित जागेचा शोध सुरू आहे. जागा मिळताच काम वेगाने सुरू होईल.
अर्णब घोष, समांतर प्रकल्प संचालक