आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खैरे प्रथमच आदेशावरून विनंतीवर!, पालकमंत्री कदमांवर अप्रत्यक्षपणे केली टीका

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- मंदिरेपाडले जाताहेत, तरी तुमचे रक्त कसे खवळत नाही, ‘सामना’तून पक्षाने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. तरीही तुम्हाला आदेशाची प्रतीक्षा का करावी लागते. मी तुम्हाला आता आदेश देऊ शकत नाही. मात्र विनंती करतो, ती विचारात घ्यायची की नाही, हे पालकमंत्र्यांना विचारा, अशा शब्दात उपनेते तथा खासदार चंद्रकांत खैरे यांनी आपली हतबलता व्यक्त केली. सिडको एन-६ येथील विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते. व्यासपीठावर उपस्थित पालिकेतील गटनेते तथा शहरप्रमुख राजू वैद्य यांना उद्देशून ते बोलत होते.
बजाजनगर येथील मंदिरे पाडण्यासाठी प्रशासन सरसावल्यापासून खा. खैरे आक्रमक झाले आहेत. सेनेतील अन्य नेत्यांनी याकडे दुर्लक्ष केले असले तरी खैरेंनी हा मुद्दा पुढे रेटला आहे. अन्य कोणीच साथ देत नसल्याची खंत खैरे यांनी व्यक्त केली. वाळूजबरोबरच, लासूर स्टेशनसारखी शहरे या मुद्द्यावर बंद होतात तर शहरात याची प्रतिक्रिया का समोर येत नाही, असा सवाल करतानाच शहरातील शिवसैनिक नेमके करतात काय, असाही प्रश्न त्यांनी वैद्य यांना उद्देशून केला. व्यासपीठावर नगरसेविका शीतल गादगे, माजी नगरसेवक वीरभद्र गादगे, नगरसेवक मकरंद कुलकर्णी, उपजिल्हाप्रमुख नंदकुमार घोडेले उपस्थित होते.

पालकमंत्री म्हणून रामदास कदम यांनी जिल्ह्याची सूत्रे हाती घेतल्यापासून खैरे हे पक्षात एकटे पडल्याचे चित्र आहे. त्यामुळेच खैरे यांनी मंदिरांचा मुद्दा उपस्थित केला तेव्हा पक्षातील कोणीही त्यांच्यासमवेत गेले नाही. यामागे कदम यांची सूचना किंवा आदेश असल्याचे बोलले जाते. याची कल्पना खैरे यांनाही आली आहे. त्यामुळेच वैद्य एका कार्यक्रमात दिसताच त्यांनी आपली खंत व्यक्त केली. शेतकऱ्यांना मदत वाटपाच्या कार्यक्रमातही लक्ष वेधण्यासाठी खैरे यांनी मंदिरांचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यावर प्रतिक्रिया देताना ‘शेतकऱ्यांच्या घरांकडेही मंदिर म्हणून बघा’ असा टोला युवा नेते आदित्य ठाकरे यांनी लगावला होता. तरीही खैरे यांनी मंदिरांचा मुद्दा सोडला नाही.

वैद्यम्हणाले ‘मला निरोप नाही’ : खैरेयांनी कानपिचक्या दिल्यानंतर ‘मला निरोपच नाही’ असे वैद्य यांनी स्पष्ट केले.

माझे रक्त खवळले
मीतहसीलदाराला बोललो, यावरून गदारोळ माजला. कारण पाच हजार महिला तेथे रडत होत्या. माझे रक्त खवळले. माझ्यावर गुन्हाही दाखल झाला. त्यावर राज्यभरातून मला फोन आले. आमच्या मंदिरांसाठीही काही तरी करा, अशी विचारणा झाली. आम्ही तुमच्या सोबत असल्याचे अन्य जिल्ह्यांतील शिवसैनिकांनी सांगितले. अन्य जिल्ह्यांतील शिवसैनिक माझ्यासोबत येतात पण शहरातील शिवसैनिकांना काय झाले, हे समजत नाही, असा सवालही खैरेंंनी केला.
मोहीम बंद पाडा
येत्यासर्वसाधारण सभेत प्रस्ताव घेऊन शहरातील मंदिरे पाडण्याची मोहीम बंद पाडा, असे खैरे यांनी वैद्य यांना सांगितले. प्रशासनाने १२०० मंदिरे पाडण्याचे ठरवले आहे. त्याविरोधात शिवसेनेने मंदिर बचाव समिती स्थापन केली आहे. शहर तसेच जिल्ह्यातील गायरान जमिनीवरील अतिक्रमणे काढावी, अशी विनंती आपण वेळोवेळी जिल्हाधिकारी, पोलिस आयुक्तांना केली, परंतु त्याकडे लक्ष देण्यात आले नाही. फक्त मंदिरांना लक्ष्य केले जात असल्याचा आरोप त्यांनी केला.