आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डॉ. राव यांच्या दीक्षांत भाषणाला 451 पैकी फक्त 13 पीएचडीधारक, महिनाभर नियोजन, तरीही अशी अवस्था

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ भारतातील ‘ट्रेंड सेटर युनिव्हर्सिटी’ आहे. बौद्ध संस्कृतींमुळे या विद्यापीठाचा जगात नावलौकिक आहे. संशोधन क्षेत्रात महाराष्ट्रात अव्वल आहे. असे नानाविध दावे कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांनी केले. खाली मान घालून वाचलेल्या भाषणामुळे त्यांचे भाषण संपेपर्यंत अख्खे सभागृह रिकामे झालेले होते. त्यामुळे प्रमुख आकर्षण डॉ. निरुपमा राव यांच्या दीक्षांत भाषणाला ४५१ पैकी फक्त १३ पीएचडीधारक अन् हजार ४५० पैकी निव्वळ २०३ जण थांबले. २०३ पैकी जवळपास १९० जण प्राध्यापक, अधिकारी असल्यामुळे त्यांना थांबणे क्रमप्राप्त होते.
 
इंग्रजी विभागाच्या माजी विद्यार्थिनी तथा माजी परराष्ट्र सचिव डॉ. निरूपमा राव यांनी दीक्षांत समारंभाचे महिनाभरापूर्वी निमंत्रण स्वीकारल्यापासून नियोजन सुरू होते. त्यासाठी १३३ कर्मचारी-अधिकाऱ्यांच्या समावेशासह २३ विविध समित्यांची स्थापना केली होती. समित्यांच्या अनेक बैठका झाल्या. पण प्रत्यक्षात जेव्हा समारंभ सुरू झाला, त्या वेळी अत्यंत ढिसाळ नियोजनाची प्रचिती आली. कुलगुरूंचे अत्यंत दीर्घ भाषण, पाहुण्यांच्या परिचयात घालवलेला अनाठायी वेळाने पीएचडीधारकांच्या सहनशीलतेचा कडेलोट झाला. कुलगुरूंनी ४५ मिनिटांचे लिखित इंग्रजी भाषण अक्षरश: खाली मान घालून वाचून काढले. भाषणादरम्यान ते अनेकदा पाणी प्यायले. त्यांना खोकल्याचा त्रास झाला. पण त्यांनी भाषण थांबवले नाही. भाषणानंतर त्यांनी समोर पाहिले तेव्हा सभागृह रिकामे झाले होते. त्यांनी जवळच बसलेल्या परीक्षा संचालक डॉ. राजेश रगडे यांना ‘विद्यार्थी कुठे गेले..?’ असे विचारले. त्यावर रगडेंनी बाहेर गेले असावेत, असे सांगितले. सभागृहात ९६० पैकी ६६ खुर्च्या व्हीव्हीआयपीसाठी होत्या. त्यावर मान्यवर स्थापापन्न होते. उर्वरित ८९४ पैकी २०३ खुर्च्यांवरच लोक होते. सभागृहाबाहेर लावलेल्या एलईडीसमोरील ५०० प्लास्टिकच्या खुर्च्यांवर कोणीच नव्हते. ज्यांच्यासाठी दीक्षांत भाषण असते अशा ४५१ पैकी १३ पीएचडीधारक सभागृहात होते. 

असे केले असते तर...
कार्यक्रमनियोजित वेळेपेक्षा दहा मिनिटे आधी सुरू झाला, पण ‘क्रम’ नीट नव्हता. विद्यापीठ गीत संपल्यानंतर लगेच पाहुण्यांचे स्वागत होणे गरजेचे होते, पण कार्यक्रम संपण्यापूर्वी त्यांना मानपत्र देऊन गौरवले. ४.३० ते ५.१५ पर्यंत म्हणजेच ४५ मिनिटे पदवी प्रदान करण्यात गेले. या वेळी स्वत: कुलगुरू आणि त्यांचे कर्मचारी डॉ. राव यांच्याकडे पाठ करून उभे होते. त्यानंतर कुलगुरूंनी निव्वळ अहवाल वाचनासारखे ४५ मिनिटे मुद्देहीन भाषण केले. पाहुण्यांचे स्वागत, त्यांचा परिचय, दीक्षांत भाषण, कुलगुरूंचे अध्यक्षीय समारोप आणि नंतर पदवी प्रदान अपेक्षित होते. सर्व क्रमच उलटा केल्याने पदवी हाती पडताच गर्मीने हैराण झालेल्यांनी लगेच सभागृह सोडले. 

असे का घडले..? 
सभागृहाबाहेरपडलेल्या काही पीएचडीधारकांशी ‘दिव्य मराठी’ प्रतिनिधीने संवाद साधला असता ते म्हणाले, आम्हाला दुपारी तीनपासून सभागृहात बसवून ठेवलेे. एक तर ‘थ्रीपीस सूट’ त्यावर गाऊन आणि सभागृहातील एसी बंद होते. पाहुणे आल्यानंतर ४. २० वाजता एसी सुरू झाले. तीन ते साडेपाचपर्यंत आम्ही कसे तरी बसून राहिलो. दीक्षांत भाषणाचे आम्हाला महत्त्व आहे. पण कुलगुरू एक तास माईक सोडणार नाही, याची आम्हाला खात्री होती. त्यामुळे डॉ. राव यांच्या सहा ते सातपर्यंतच्या भाषणासाठी बसणे कसे शक्य होते? 
बातम्या आणखी आहेत...