आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Cooperator Girjaram Halnor Question In Standing Commity

तिजोरीतील पैसा जातो कुठे? गिरजाराम हाळनोर यांचा स्थायी समिती बैठकीत सवाल

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - ‘नागरिकांचा पाणीपुरवठा खंडित होतो..टँकरने पाणीपुरवठा केला जात नाही... ठेकेदारांची देयके थकीत आहेत... मग मनपाच्या तिजोरीतील पैसा जातो कुठे.? असा संतप्त सवाल नगरसेवक गिरजाराम हाळनोर यांनी सोमवारी स्थायी समितीच्या बैठकीत केला, तर पाणीटंचाईच्या प्रश्नावर राजू वैद्य, समीर राजूरकर, बालाजी मुंडे यांनी सभागृह दणाणून सोडले.

सोमवारी भूखंड वाटपाच्या कार्यक्रमामुळे स्थायी समितीची बैठक दीड तास उशिराने सुरू झाली. सुरुवातीलाच हाळनोर यांनी पाणीटंचाईवर प्रशासनाचे लक्ष वेधले. पाणीटंचाईचा सामना करण्यासाठी शहरातील विहिरी अधिग्रहित करण्याची सूचना हाळनोर यांनी सभापती विकास जैन यांना केली. त्याशिवाय नव्याने विंधन विहिरी घेण्यासाठी प्रशासनाने प्रयत्न करावे, पण नागरिकांना पाणी द्यावे असेही ते म्हणाले. समीर राजूरकर यांनी तर दहा वॉर्डांना नऊ दिवस निर्जळी सहन करावी लागल्याचे सांगत पाणीपुरवठा विभागाच्या अधिकार्‍यांना धारेवर धरले. धावणी मोहल्ला, गुलमंडी, औरंगपुरा, शारदार्शम कॉलनी, क्रांती चौक आदी भागात नऊ दिवस पाणी देण्यात आले नाही. नागरिक पाणीपट्टीचा नियमित भरणा करतात. मग त्यांना आपण पाण्याशिवाय वंचित कसे काय ठेवू शकतो.? असा सवाल करत त्यांनी 90 हजार नागरिकांना नऊ दिवसांदरम्यान टँकरनेही पाणी दिले नसल्याचे सभापतींच्या निदर्शनास आणून दिले. दरम्यान पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता सखाराम पानझडे यांनी पैसे नसल्याने ठेकेदारांची देयके दिली जात नसल्याचा मुद्दा सलग दुसर्‍या बैठकीत उपस्थित केला. त्यानंतर संतप्त होऊन वैद्य यांनी पैसे नसल्याचे कारण दाखवत अधिकार्‍यांना आपली जबाबदारी झटकता येणार नसल्याचे म्हटले. ठेकेदारांची देयके देण्यासाठी आयुक्त, सभापती, पदाधिकारी आणि अधिकार्‍यांची संयुक्त बैठक बोलवण्याची विनंतीही त्यांनी सभापतींना केली.

नोटीस भलत्यालाच!
सलीम अली सरोवराजवळ सुमारे साडेपाच हजार चौरस फुटाच्या मनपाच्या भूखंडावर अतिक्रमण झाल्याचे नारायण कुचे यांनी सभागृहाच्या निर्दशनास आणून दिले. अतिक्रमण विरोधी पथकाने अतिक्रमणकर्त्यांना नोटीस बजावण्याऐवजी तक्रारकर्त्यालाच नोटीस बजावली. यामध्ये इमारत निरीक्षकाचाही समावेश असून त्यांना निलंबित करून अतिक्रमण करणार्‍यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी कुचे यांनी केली. प्रत्युत्तरादाखल अतिक्रमण विरोधी पथकाच्या प्रमुख प्रियंका केसरकर यांनी आपण नियम 260/478 नुसार कारवाई केली असून चौकशी करण्यात येईल, असे सांगितले. त्यानंतर कुचे यांनी सभापतींना स्थळ पाहणीसाठी आग्रह धरल्याने मंगळवारी सकाळी अकरा वाजता स्थळ पाहणी करण्याचे मान्य केले. त्याचबरोबर आरोग्य अधिकारी जयर्शी कुलकर्णी यांच्यासह स्थायी समिती बैठकीला दांडी मारणार्‍या अधिकार्‍यांना नोटीस बजावण्याच्या सूचनाही सभापतींनी प्रशासनाला केल्या आहेत.