आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वॉर्ड पुनर्रचनेसाठी नगरसेवकांचीच पळापळ सुरू

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - प्रभागा ऐवजी वॉर्ड पद्धतीनेच निवडणूक होणार हे जाहीर झाल्यानंतर आता प्रत्यक्ष वॉर्ड रचनेची प्रक्रिया सुरू झाली अन् प्रशासकीय अधिकाऱ्यांपेक्षा विद्यमान तसेच भावी नगरसेवकांचीच जास्त पळापळ असल्याचे समोर आले.
नव्याने होणाऱ्या वॉर्डात आपल्याच सोयीची गल्ली, रस्ता तसेच काही मतदार असावेत, यासाठी आटापिटा सुरू झाला असल्याने सध्या या कामासाठी नियुक्त अधिकाऱ्यांचा भाव कमालीचा वधारला असल्याचे सांगण्यात येते.

हर्सूल (वॉर्ड क्रमांक-१) येथून वॉर्ड रचनेला प्रारंभ होईल. या भागातील लोकसंख्या वाढल्यामुळे हर्सूल, जटवाडा रोड, जाधववाडी, मयूर पार्क येथे सध्या दोनच वॉर्ड आहेत. तेथे किमान तीन ते चार वॉर्ड होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सोयीचे वार्ड व्हावेत, जातीनिहाय लोकसंख्येचा विचार होऊन भविष्यात वॉर्डाचे आरक्षण आपल्या सोयीचे व्हावे यासाठी विद्यमान नगरसेवकांनी प्रयत्न सुरू केले आहेत.

हर्सूलसह नारेगाव, आंबेडकरनगर, मिटमिटा, पडेगाव, पैठण रोड, शिवाजीनगर या भागातील वॉर्डांची संख्या वाढणार हे नक्की आहे. त्यामुळे या परिसरातील कार्यकर्ते कमालीचे सक्रिय झाले आहेत. वॉर्ड रचनेचे अधिकार असलेला अधिकारी नेमका कोठून आला, तो कोणाच्या जवळचा आहे, याची माहिती घेऊन ही मंडळी कामाला लागली आहे.

जुन्या शहरातील वॉर्डांची संख्या वाढणार नाही, उलट क्षेत्र वाढू शकते. हे क्षेत्र वाढताना कोणता परिसर आपल्या वॉर्डात असावा नि कोणता असू नये यासाठीही प्रयत्न सुरू झाले आहेत. यात काही नगरसेवक आघाडीवर असून अधिकाऱ्यासमोर ही मंडळी लोकसंख्या, तेथील मतदारसंख्या अन् भौगोलिक क्षेत्र अशी सर्व माहिती घेऊन हजर झाले असल्याचे गेल्या दोन दिवसांच्या कामकाजातून समोर आले.

२०१० मध्ये घडलेला एक किस्सा असा...
२००५ मध्ये नगरसेवक असलेल्या एकाने सोयीचा वॉर्ड असावा यासाठी अधिकाऱ्याला वेगवेगळ्या पद्धतीने धारेवर धरले. एकच सोयीची गल्ली त्याला नव्या वॉर्डात घ्यायची होती. तो अधिकारीही भलताच अवलिया निघाला. त्याने दुसऱ्या दोन भलत्याच गल्ल्या या नगरसेवकाच्या वॉर्डात जोडून दिल्या. कारण एकच होते. नको त्या अधिकाऱ्याचा दबाव या नगरसेवकाने आणला होता. पुढे या नगरसेवकाने आयोगाकडे धाव घेतली. आक्षेप घेतला. पण काही झाले नाही. २०१० मध्ये तो पुन्हा निवडून आला. त्या अधिकाऱ्याकडे गेला. म्हणाला, मी आता बघून घेईन. तो म्हणाला, बघून घ्या पण भाषा चांगली ठेवा. आता ते चांगले मित्र आहेत. काल ते एका हॉटेलात वॉर्डाचे नियोजन करत होते.

आयोगाचा नियम
भौगोलिक सीमा असल्यास अधिक चांगले असा आयोगाचा नियम आहे. परंतु नाला, गल्ली, रस्ता या सीमा वॉर्डाच्या रचनेसाठी बंधनकारक आहेतच, असे नाही. याचा अभ्यास करून काही पदाधिकारी अधिकाऱ्यांना कोंडीत पकडण्याच्या तयारीत असल्याचे समजते.