औरंगाबाद - महानगरपालिकेतील अधिकारी कार्यालयात बसून काम करण्याऐवजी घरी बसून काम करतात, कर्मचा-यांनाही ते घरी बोलावून घेतात हा प्रकार चुकीचा असून यापुढे घरी बसून काम कराल, तर तुमच्या घरी येऊ, असा सज्जड दम स्थायी समिती सभापती विजय वाघचौरे यांनी आज स्थायी समितीच्या बैठकीत दिला.
नव्या सभापतींची ही पहिलीच बैठक होती. आजच्या बैठकीत त्यांनी प्रशासन कसे काम करते याचा आढावा घेतला. परिणामी एलबीटी, मालमत्ता कर, पाणीपट्टी, नालेसफाई यासारख्या विषयांवरही ते फारसे आक्रमक झाले नाहीत; पण सभापती झाल्यापासून एक महिन्यात पाहिलेल्या कामकाजावरून त्यांनी अधिकाºयांना आज पहिला दणका दिला. उपायुक्त सुरेश पेडगावकर हे घरी बसून काम करतात, असे त्र्यंबक तुपे यांनी चर्चेदरम्यान सांगितले. त्याचा उल्लेख करीत, पण पेडगावकरांचे नाव न घेता वाघचौरे यांनी आज कामचुकार व मनमानी काम करणा-याअधिकाºयांना चांगलेच खडसावले. ते म्हणाले की, मी महिनाभरात पाहिले आहे की काही अधिकारी कार्यालयात बसून काम करीतच नाहीत. बाहेर बसून काम करतात, काही जण घरी बसून फायली हातावेगळ्या करतात, हाताखालच्या कर्मचाºयांना घरी बोलावून कामे करतात. यापुढे हे चालणार नाही. कोण कोठे बसते याची माहिती आमच्याकडे आहे. आमचीही यंत्रणा आहे. यापुढे कार्यालयात नसाल, तर जिथे असाल तेथे येऊ, ठिकाण शोधण्याची आमच्याकडेही यंत्रणा आहे, असा दमच त्यांनी भरला. वाघचौरे म्हणाले की, अधिकाºयांनी कार्यालयात बसलेच पाहिजे. लोक अपेक्षेने येत असतात. त्यांना हे अधिकारी भेटत नाहीत. फोन केले तरी उपलब्ध होत नाहीत. यापुढे हा प्रकार खपवून घेतला जाणार नाही, असेही ते म्हणाले.