आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आचारसंहितेआधी तीन कामे मार्गी लागणार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता आता फक्त महिनाभरावर येऊन ठेपली असताना मनपात कामे मार्गी लावण्याची लगबग सुरू झाली असून प्रशासनाने सध्या चार कामांवर लक्ष केंद्रित केले आहे. त्यापैकी शहरातील पथदिव्यांच्या यंत्रणेचे नूतनीकरण व 22 कोटींच्या रहदारी करवसुली या कामांच्या निविदा या आठवड्यात निघणार आहेत. शिवाय भूमिगत गटार योजनेचे काम जवळपास मार्गी लागल्यातच जमा आहे.

मनपा आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे यांनी सांगितले की, प्रशासनाने सध्या चार कामे लवकरात लवकर कशी मार्गी लागतील यावर लक्ष केंद्रित केले आहे. त्यात अंदाजे 100 कोटी रुपयांचा पथदिव्यांचा प्रकल्प आहे. त्यात शहरातील पथदिव्यांची यंत्रणा बदलली जाणार असून एलईडीचे दिवे लागणार आहेत. शिवाय खांब, केबलिंग व विद्युतीकरणाची ही यंत्रणा जवळपास सगळीच बदलली जाणार आहे. या योजनेतून शहराच्या पथदिव्यांचा प्रश्न मार्गी लागणार आहे. या कामाची निविदा या आठवडाभरात काढली जाईल. 21 दिवस मुदतीची ही निविदा असेल. आचारसंहितेपूर्वी ही प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. याशिवाय रहदारी कराचे सध्याचे कंत्राट सप्टेंबरमध्ये संपत आहे. त्यामुळे त्या कामाचीही निविदा आताच काढली जाईल. कारण नंतर आचारसंहितेमुळे ते काम थेट नोव्हेंबरपर्यंत लांबणीवर पडेल.

हा तिढाही सुटेल
भूमिगत गटार योजनेचे कामही मार्गी लागले आहे. त्याचे उद्घाटनही लवकरच होईल. प्रत्यक्ष काम लवकर सुरू व्हावे असा आमचा मानस आहे. समांतर जलवाहिनीचे कामही आचारसंहितेपूर्वी सुरू करण्याचे आमचे प्रयत्न आहेत; पण सध्या या कामाच्या तांत्रिक व आर्थिक बाबींबाबत ठेकेदार कंपनीत विचार सुरू आहे. त्यांच्या निर्णयानंतर चर्चा होऊन मार्ग निघण्याची शक्यता आहे. हा तिढाही सुटेल.
डॉ. हर्षदीप कांबळे, आयुक्त, मनपा
22 कोटींची निविदा काढणार
सध्याच्या कंत्राटानुसार ही निविदा 18 कोटींची आहे. त्यात किमान 15 टक्के वाढ गृहीत धरून 22 कोटी रुपयांची निविदा काढली जाईल. गतवर्षी दोनदा निविदा काढावी लागली होती. त्यामुळे आधीच हे काम पूर्ण करणे आवश्यक आहे.