आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Corporation Officer Not Knowing The Tax Collection

महापालिकेतील अधिका-यांना थकबाकीदार किती याचीच माहिती नाही

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - मालमत्ता, पाणीपट्टी कर मनपाच्या उत्पन्नाचा महत्त्वाचा स्रोत आहे. हा कर भरला गेला तरच विकासकामांना चालना मिळते. शहरात एक लाख 65 हजार मालमत्ताधारक आहेत; परंतु यापैकी किती लोकांनी कर थकवला याची माहितीच वसुली अधिकार्‍यांकडे नसल्याची धक्कादायक माहिती दै. ‘दिव्य मराठी’ने केलेल्या पाहणीत समोर आली आहे.

कराची प्रभावीपणे वसुली होत नसल्याने पालिकेची आर्थिक स्थिती बिकट झाली आहे. शिवाय करवसुली करण्यासाठी मनपा प्रशासनही चालढकल करत असल्याचे निदर्शनास येत आहे. गेल्या वर्षी 35 टक्के कर वसूल करण्यात आला. मालमत्ता आणि पाणीपट्टी करातून पालिकेला दीडशे कोटींचे आर्थिक उत्पन्न मिळू शकते. मात्र, करवसुली होत नसल्याने सहाशे कोटींची मालमत्ता गहाण ठेवून दोनशे कोटींचे कर्ज काढण्याची नामुष्की ओढवली आहे. गतवर्षी 26.41 टक्के मालमत्ता कर, तर 9.2 टक्के पाणीपट्टी कर मिळून 35 कोटी 44 लाख 60 हजार 150 रुपये वसूल करण्यात आले होते. या वर्षी 42 कोटी मालमत्ता आणि 12 कोटी 56 लाख रुपये पाणीपट्टी कर वसूल करण्यात आला आहे. गत वर्षीपेक्षा 11 टक्क्यांनी कराची वसुली अधिक असली तरी नवीन मालमत्तांचा यामध्ये समावेश केलेला दिसून येत नाही. तसेच किती कर थकबाकीदार आहेत याची माहिती नसल्याचे अधिकारी सांगतात. करवसुलीला चालना दिली तरच विकासकामांना गती मिळणार आहे.

संगणकीकरणाचा अभाव
लोक कर भरण्यास तयार आहेत. मात्र, महानगरपालिका प्रशासनाकडे नियोजनाचा अभाव आहे. कर्मचार्‍यांची संख्या कमी आहे आणि संगणकीकरण केलेले नाही. यामुळे कर भरण्यासाठी इच्छुक असलेले लोक भरणा करण्यास टाळाटाळ करतात. शिवाय त्यांना बराच वेळ रांगेत उभे राहावे लागते. त्यामुळे कर भरण्यासाठी ऑनलाइन सेवा उपलब्ध करून देण्यात यावी, पुरेशा कर्मचार्‍यांची नियुक्ती करावी. राजू शिंदे, नगरसेवक.
जबाबदार अधिकार्‍यांना थकबाकीदारांची माहिती नाही
शिवाजी झनझन, कर वसुली प्रमुख
प्र. निवासी, निवासेतर, वाणिज्य करांचे थकबाकीदार किती आहेत ?
उ. सध्या सांगता येत नाही. उद्या माहिती घेऊन सांगतो.
प्र. थकबाकीदारांची यादी प्रसिद्ध का करत नाही ?
उ. करवसुलीला अडचणी येतात. थकबाकीदार कर भरण्यास तयार आहेत. त्यामुळे यादी प्रसिद्ध केली नाही, पण कर न भरल्यास आयुक्तांच्या परवानगीने यादी लवकरच प्रसिद्धी केली जाईल.
सपना वसावा, प्रशासकीय अधिकारी
प्र. मालमत्ताधारक किती आहेत ?
उ. 1 लाख 65 मालमत्ताधारक आहेत.
प्र. कर थकबाकीदार किती आहेत?
उ. याची माहिती शिवाजी झनझन साहेब देतील
प्र. थकबाकीदारांची यादी प्रसिद्ध करणार आहात का ?
उ. याबाबत आयुक्त निर्णय घेतील.

आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे
प्र. कर थकबाकीदारांविषयी माहिती हवी
उ. आज अर्थसंकल्प स्थायी समितीसमोर सादर करण्याची घाई आहे. उद्या माहिती देतो.