आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Corporation Removing D.P. Kulkarni From Assistant Director Of Planing

मनपा हटवणार डी. पी. कुलकर्णी यांना नगररचना सहाय्यक संचालकपदावरून

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने स्थगिती दिलेली असूनही डी. पी. कुलकर्णी यांना नगररचना सहायक संचालकपदावरून (एटीडीपी) हटवण्याचा प्रस्ताव 12 एप्रिलच्या मनपा सर्वसाधारण सभेसमोर पुरवणी विषयपत्रिकेत मांडण्यात आला आहे. शिवसेनेच्या शिवाई ट्रस्ट इमारतीला अतिरिक्त बांधकामाबद्दल नोटीस बजावल्याने कुलकर्णी यांना हटवण्याच्या हालचाली सुरू असल्याची चर्चा मनपा वर्तुळात आहे.

2009 अखेरपर्यंत कार्यकारी अभियंता म्हणून कार्यरत असलेले कुलकर्णी यांची तत्कालीन आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनी नगररचना सहायक संचालकपदी बढतीवर नियुक्ती केली होती. त्यानंतर शासनाकडून आलेले अधिकारी भंडारी यांच्याकडे पदभार देण्याविरुद्ध कुलकर्णी यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. तेव्हा सात जून 2010 रोजी न्यायमूर्ती एन. डी. देशपांडे, पी. व्ही. हरदास यांनी कुलकर्णी यांच्याकडून कार्यभार काढण्यास स्थगिती दिली. पाच महिन्यांपूर्वी कुलकर्णी यांनी शिवाई ट्रस्टमधील अतिरिक्त बांधकामाबद्दल दंड आकारणीची नोटीस बजावली. त्यानंतर त्यांच्याविरुद्ध मोहीम उघडण्यात आली. 2009 ते 2012 कालावधीत नगररचनामध्ये गैरकारभार झाला. त्याची चौकशी करण्याचा प्रस्ताव सर्वसाधारण सभेत मंजूर झाला. मात्र, प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने त्याची अंमलबजावणी करण्यास आयुक्तांनी नकार दिला. त्यामुळे 12 एप्रिलच्या सभेत कृष्णा बनकर, वीरभद्र गादगे, पंकज भारसाखळे, किशोर नागरे, गिरजाराम हाळनोर यांनी कुलकर्णी हटावचा अशासकीय प्रस्ताव मांडला आहे. या पदावर शासनाचा अधिकारी असावा, असा दिवाणी अर्ज कुलकर्णी यांनी स्थगिती मिळवलेल्या याचिकेत उच्च न्यायालयामध्ये दाखल करावा, असेही या प्रस्तावात म्हटले आहे.